हायलाइट्स:
- मध्य प्रदेशात आमदाराच्या मुलाची गोळ्या झाडून आत्महत्या
- घटनेवेळी घरात कुणीच नव्हते, आई-वडील गेले होते बाहेरगावी
- घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये मित्रांचा उल्लेख
- आत्महत्या करण्यामागील कारणांचा पोलिसांकडून शोध सुरू
आमदार संजय यादव यांचा लहान मुलगा विभोर हा बारावी इयत्तेत शिकत होता. विभोरने टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप ठोस माहिती मिळू शकलेली नाही. घटना घडली त्यावेळी घरात कुणीही नव्हते. पोलिसांना घटनास्थळाहून एक सुसाइड नोट सापडली आहे. याबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती दिलेली नाही. घटना घडली त्यावेळी आमदार यादव हे बाहेरगावी होते. तर त्यांची पत्नी सीमा यादव या भोपाळला काही कामानिमित्त गेल्या होत्या. मोठा मुलगा समर्थ यादव या सिवनी टाला स्थित पेट्रोल पंपावर गेला होता.
विभोरने चार पानी इंग्रजी भाषेत लिहिलेली सुसाइड नोट घटनास्थळावर मिळाली आहे. त्याचे मित्र बोलावताहेत. माझे मम्मी आणि पप्पा खूप चांगले आहेत, असा मजकूर या नोटमध्ये आहे. या नोटमधील सविस्तर मजकुराबाबत पोलिसांनी काहीही माहिती दिलेली नाही. मृत विभोरने ज्या रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली, ते संजय यादव यांच्या नावावर रजिस्टर्ड आहे. आमदार यादव हे रिव्हॉल्व्हर स्वतःच्या सुरक्षेसाठी बाळगायचे. मात्र, घटना घडली त्यादिवशी ते सोबत घेऊन जाण्यास विसरले अशी माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर यादव यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार बैठक सोडून रुग्णालयात पोहोचले होते. विभोरने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस त्या कारणांचा शोध घेत आहेत.
विभोर याने आत्महत्येपूर्वी आपल्या पाच मित्रांना गुड बायचा मेसेज पाठवला होता. तुम्ही सगळे जण स्वतःची काळजी घ्या. मी निघून जात आहे, असे त्याने मेसेजमध्ये म्हटले होते. तर नोटमध्ये आपला मित्र वर एकटाच आहे. मीही त्याच्याकडे जात आहे, असा मजकूर होता. पण या नोटमधील सविस्तर मजकुराबाबत पोलीस काहीही माहिती देऊ शकले नाहीत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times