हायलाइट्स:
- वर्दीतील अधिकाऱ्यानं घडवलं माणुसकीचं दर्शन
- महिला पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
- पोलीस आयुक्तांनीही घेतली दखल
बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना आणि अनेक ठिकाणी कंबरेइतकं पाणी साचलेलं असताना पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असमाऱ्या राजेश्वरी यांनी बेशुद्ध अवस्थेतीला एका रुग्णाला वेळीच रुग्णालयात पोहचवण्यासाठी मदत केली. त्यामुळे या रुग्णाचे प्राण वाचू शकलेत.
टी पी छत्रम भागात ही घटना घडलीय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. चेन्नईचे पोलीस आयुक्त शंकर जिवाल यांनी आपल्या सहकारी महिलेच्या धाडसाचं कौतुक केलंय. ‘पोलीस निरीक्षक राजेश्वरी अनेकदा अशी धाडसी आव्हानं पेलतात. आज रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या एका व्यक्तीला तत्काळ वैद्यकीय मदतीची गरज होती. राजेश्वरी यांनी या रुग्णाला आपल्या खांद्यावर उचलून त्याची मदत केली तसंच त्याला वेळीच रुग्णालयात पोहचण्यास केली’ अशी माहिती जिवाल यांनी दिलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओत बेशुद्धावस्थेत दिसणारा व्यक्ती २८ वर्षांचा आहे. गुरुवारी एका स्मशानभूमीजवळ तो बेशुद्धावस्थेत राजेश्वरी यांना आढळला होता. व्हिडिओत रुग्णाला खांद्यावर उचलून घेतलेल्या राजेश्वरी अगोदर गाडीत घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र काही कारणामुळे हे शक्य होत नाही. त्यामुळे त्या रुग्णाला समोर असलेल्या रिक्षापर्यंत खांद्यावरूनच घेऊन झातात. एका व्यक्तीसोबत त्या रुग्णाला रुग्णालयात पाठवताना दिसत आहेत.
गुरुवारी शहरात मुसळधार पाऊस सुरू होता. चेन्नईतल्या अनेक भागांत पूरसदृश्यं परिस्थिती निर्माण झाली होती. या पावसात आतापर्यंत राज्यातील १२ जणांनी आपले प्राण गमावल्याची माहिती मिळतेय.
बऱ्याचदा समाजात वावरणाऱ्या अशा खऱ्याखुऱ्या हिरोंची दखलही घेतली जात नाही. मात्र सोशल मीडियामुळे या धाडसी महिला पोलीस अधिकाऱ्याकडून रुग्णाला योग्य वेळेत मिळालेली छोटीशी मदत अनेकांसमोर आलीय. सोशल मीडियावर राजेश्वरी यांचं जोरदैर कौतुक होतंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times