हायलाइट्स:
- पतीकडून पंधरा वर्षांपासून सुरू होती छळवणूक
- वैतागून पत्नीनेच पोलिसांत केली तक्रार
- पोलिसांनी अटक करून कोठडीत केली रवानगी
- मध्य प्रदेशातील छतरपूरमधील घटना
या दाम्पत्याच्या लग्नाला पंधराहून अधिक वर्षे झाली. या कालावधीत पती आपल्या पत्नीला बेदम मारहाण करत असे. तिचा मानसिक छळ करत होता. यावरून पत्नीने पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी कारवाई करून आरोपीला अटक केली आणि त्याची रवानगी तुरुंगात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सटई रोड भागातील हे प्रकरण आहे. ३२ वर्षीय संगिता सिंह चंदेल हिने आपला पती बबलू सिंह याच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी पत्नीला मारहाण आणि छळवणूक केल्याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली. त्यानंतर कोर्टात हजर केल्यानंतर त्याची रवानगी कोठडीत झाली आहे.
पीडित पत्नीच्या तक्रारीनुसार, तिचे लग्न १५ वर्षांपूर्वी बबलू सिंह उर्फ केसरी याच्यासोबत झाले होते. तिला एक १३ वर्षांचा मुलगा आणि एक ११ वर्षांची मुलगी आहे. तिच्या पतीला दारूचे व्यसन आहे. दारूच्या व्यसनापायी त्याने आपली सर्व वारसाने मिळालेली संपत्ती विकली. पत्नीकडे जे काही होते, तेही त्याने विकले. गेल्या काही वर्षांपासून ती आपल्या माहेरी राहते. शिवणकाम करून ती आपला आणि मुलांचा उदरनिर्वाह चालवते. तिचा पतीही तिच्याकडे राहायला गेला. तिथे जाऊन तिच्याकडे पैशांची मागणी करत असे. पैसे नाही दिले तर, तिला मारहाण करायचा. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी देत होता. इतकेच नाही तर, तो मुलांनाही मारहाण करायचा.
दररोज होणाऱ्या या भांडणांमुळे घरातील वातावरण तणावाचे होते. मुलांचे पुढचे भवितव्यही अंधारात राहील, अशी भीती तिला वाटत होती. अखेर दारूड्या पतीच्या त्रासाला वैतागून तिने पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. दारूड्या पतीपासून सुटका करून घेण्यासाठी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times