हायकोर्टाची नवाब मलिक यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती
नवाब मलिक यांनी जाहीर केलेल्या कागदपत्रांविषयी भाष्य करत कोर्टाने मलिक यांना काही प्रश्न विचारले आहेत. ‘तुम्ही आमदार, मंत्री आणि एका राष्ट्रीय राजकीय पक्षाचे प्रवक्ते आहात, मग संबंधित कागदपत्राचा आधार घेताना तुम्हाला अधिक काळजी घेणे आवश्यक नव्हते का? कारण त्या कागदपत्रात नंतर अक्षरे घुसडल्याचे सध्या डोळ्यांनाही दिसते,’ असं कोर्टाने म्हटलं आहे.
‘पालिकेने समीर वानखेडे यांच्या नावाने दिलेला कथित जन्मदाखला ट्वीट करण्यापूर्वी वाजवीरित्या तपासल्याचे तुम्ही म्हणता.. पण ती तपासणी कशी केली हे महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य व्यक्तीला कदाचित तितक्या काळजीपूर्वक तपासता येणार नाही, पण आमदार, मंत्री असलेल्या व्यक्तीने अधिक काळजी घेऊन तपासणं अपेक्षित आहे, कारण जेव्हा डोळ्यांनाही दिसतं की त्यात काही तरी घुसडले आहे,’ अशा शब्दांत हायकोर्टाने नवाब मलिक यांना फटकारलं आहे.
नवाब मलिक यांनी बाजू मांडताना काय म्हटलं?
हायकोर्टाने विचारलेल्या प्रश्नांना नवाब मलिक यांच्याकडून त्यांचे वकील अतुल दामले यांनी बाजू माडंली. ‘मी काही स्वतः कागदपत्रे तयार केलेले नाहीत. वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर जे काही पोस्ट केलं होतं, त्याचाच आधार घेऊन मी ट्वीट केले. अर्जदार ज्ञानदेव वानखेडे यांनी स्वतःच २०१५ मध्ये त्यांचे फेसबुक अकाऊंट अपडेट करताना दाऊद वानखेडे असं नाव लिहिलं होतं. मग मी त्यांना दाऊद म्हणून त्यांची बदनामी कशी केली हे समजत नाही,’ असं मलिक यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
‘वानखेडे यांच्या मुलाच्या व मुलीच्या बाबतीत मी जे ट्वीट केले त्याविषयी ज्ञानदेव वानखेडे हे कायदेशीरदृष्ट्या आक्षेप घेऊ शकत नाहीत आणि माझा मुलगा व मुलगी योग्य ती कायदेशीर कार्यवाहीची पावले उचलतील, असे वानखेडे यांनीच त्यांच्या दाव्यात म्हटलं आहे. शिवाय मी जे काही समोर आणलं त्याची दखल घेऊनच आता समीर वानखेडे यांच्या जातीचा दाखला, खंडणीचे आरोप इत्यादींविषयी चौकशी सुरू झाली आहे,’ असा दावा नवाब मलिक यांच्या वतीने करण्यात आला आहे.
दरम्यान, हायकोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकला असून याबाबतचा अंतरिम आदेश राखून ठेवला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times