हायलाइट्स:
- ठाणे पोलिसांकडून गुरुवारी रात्री ‘ऑपरेशन ऑल आऊट’
- १७० पेक्षाही अधिक आरोपींना अटक
- पोलीस ठाण्यातील तसंच गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी झाले होते सहभागी
पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांच्या आदेशानुसार गुरुवारी रात्री ९ वाजता सुरू झालेले ऑपरेशन ऑल आऊट शुक्रवारी रात्री १ वाजता संपले. चार तासामध्ये ठाणे पोलिसांनी संपूर्ण आयुक्तालयाचा परिसर पिंजून काढत आरोपींसह इतरही गोष्टींची झाडाझडती घेतली.
हॉटेल, लॉजेस, ढाबे, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, पडक्या इमारती-घरे, बंद वाहने, गर्दुल्यांचा वावर असलेली ठिकाणे, निर्जन स्थळे, गुन्हेगारी वस्त्या, झोपडपट्ट्या, संवेदनशील ठिकाणे आदींची तपासणी केली. तडीपार, फरारी तसंच सराईत आरोपींची झाडाझडती घेत पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली.
याशिवाय बेकायदा धंद्यावरही छापे टाकत कारवाईचा बडगा उगारला होता. अशाप्रकारे पोलिसांनी ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथमध्ये राबवलेल्या ऑपरेशन ऑल आऊटमध्ये १७० पेक्षाही अधिक आरोपींना अटक केली. यापैकी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी १४ आरोपींना अटक करण्यात आली. अजामीनपात्र वॉरंट बजावलेल्या १५ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून १८ हद्दपार आरोपी, ३ संशयित आरोपींच्या देखील मुसक्या आवळल्या आहेत. याशिवाय दारूबंदी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत १४ गुन्हे दाखल करत १४ आरोपींना अटक केली आहे. चार जुगारींनाही पोलिसांनी पकडले असून एनडीपीएस कायद्याअतंर्गत ६१ गुन्हे दाखल करत ६१ आरोपींना गजाआड करण्यात आलं आहे. याशिवाय इतरही आरोपींचा शोध घेऊन १४ आरोपींच्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
दरम्यान, गुन्हे शाखेने ६ हद्दपार आरोपींसह अन्य आरोपी असे एकूण २५ पेक्षाही अधिक आरोपींना अटक केली आहे. या ऑपरेशन ऑल आऊटमध्ये पोलीस ठाण्यातील तसंच गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी सहभागी झाले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times