संजय राऊत यांनी आज मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला. महाविकास आघाडीत ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी राज्यसभेच्या दोन जागा लढणार आहे. राज्यसभेत शिवसेना आणि राष्ट्रवादीची जास्त मतं आहेत. त्याखालोखाल काँग्रेसचीही मतं आहे. त्यामुळे सातवी जागा आम्ही जिंकू शकतो, असं राऊत म्हणाले. या सातव्या जागेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झालेली आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला असून त्याजागेवर राष्ट्रवादीने माजी मंत्री फौजिया खान यांच्या नावाची घोषणा केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर थेट भाष्य करणं टाळलं. मनसे हा स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. काय करावं आणि काय नाही हे त्यांना चांगलं माहीत आहे. त्यामुळे एखाद्या राजकीय पक्षाला सल्ला देणं योग्य नाही. मनसेला १४ वर्ष पूर्ण झालीत. त्यांना आमच्या शुभेच्छा, असं राऊत म्हणाले.
दरम्यान, राज्यसभेची सातवी जागा राष्ट्रवादीकडे येत असली तरी ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसनेही जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन राज्यसभेच्या जागेबाबत चर्चा केली. सोनिया गांधी या बुधवारी राज्यसभेच्या या जागेबाबत पक्षाची भूमिका जाहीर करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times