पुणे: व्यासंगी आणि प्रभावी वक्ते, माजी संपादक यांचं आज पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६७ वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. दीक्षित यांच्या निधनाने महाराष्ट्र एका जाणत्या आणि अभ्यासू संपादकाला मुकल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

अनंत दीक्षित हे गेल्या दोन वर्षांपासून किडनी विकाराने त्रस्त होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना हृदयविकाराचाही त्रास जाणवत होता. गेल्या दोन महिन्यांपासून तर त्यांची प्रकृती आणखीनच खालावली होती. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना आज पुण्याच्या रत्ना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच आज सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दीक्षित यांच्या पार्थिवावर बुधवारी ११ मार्च रोजी सकाळी ९ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची कन्या अमृता स्कॉटलंडमध्ये असते. ती मंगळवारी संध्याकाळपर्यंत पुण्यात परतेल. त्यानंतर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार होतील, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.

दीक्षित हे मूळचे सोलापूरच्या बार्शीचे होते. केसरीतून त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर ‘सकाळ’मध्ये काम पाहिले. कोल्हापूर ‘सकाळ’मध्ये ते उपसंपादक ते वृत्तसंपादक म्हणून १९८२ ते २००० सालापर्यंत कार्यरत होते. त्यानंतर २०००साली पुणे ‘सकाळ’च्या संपादकपदी ते रुजू झाले. पुणे ‘सकाळ’मध्ये त्यांनी चार वर्षे संपादक म्हणून काम पाहिलं. त्यानंतर पुणे ‘लोकमत’मध्ये ते संपादक म्हणून रुजू झाले. ‘लोकमत’मधून निवृत्त झाल्यावरही ते पत्रकार म्हणून क्रियाशील होते. वृत्तवाहिन्यांवर राजकीय विश्लेषक म्हणून त्यांनी ठसा उमटविला होता. पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या दीक्षित यांची सडेतोड राजकीय विश्लेषक म्हणून ख्याती होती. अचूक आणि निष्पक्ष मांडणी हे त्यांचं वैशिष्ट्ये होतं. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्राची अपरिमित हानी झाली असून एका अभ्यासू संपादकाला महाराष्ट्र मुकल्याची भावना व्यक्त होत आहे.

पुरोगामीत्वाची बूज राखणारा सडेतोड संपादक: मुख्यमंत्री

दीक्षित यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची बूज राखणारा, सडेतोड आणि वृत्तपत्रीय क्षेत्रात संपादकीय जाणीवा जिवंत ठेवणारा सच्चा पत्रकार, संपादक म्हणून अनंत दीक्षित स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवंगत दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कोल्हापूरच्या विकासाला आपल्या लेखणी आणि वाणीने आकार देण्यात दीक्षित यांचा मोठा वाटा होता. साहित्यिक, सांस्कृतिक, औद्योगिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील त्यांचे योगदान करवीरवासिय कायमच स्मरणात ठेवतील. राज्यातील अनेक सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर त्यांनी आपली सडेतोड भूमिका मांडली. त्यांचे विवेचन वस्तुनिष्ठ व तर्कावर असायचे. प्रश्न धसास लागेपर्यंत त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमांतून प्रयत्न केले. नवे लेखक आणि कविंना ‘सकाळ’च्या माध्यमातून त्यांनी एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे अनेक लेखक-कवी घडले, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

कोल्हापूरकरांना दीक्षित सरांचे शेवटचे पत्र

सर्व मित्रांना

स.न.

आपल्याशी संवाद साधण्यासाठी हा पत्रप्रपंच आहे. सतत कोल्हापूरची आठवण येते. लोकही मनापासून प्रकृतीची चौकशी करतात. अलीकडे माझ्या मनाने हळवेपणाचा सूर पकडलेला दिसतो. प्रकृती आणि त्यामुळे येणारे क्षण फार विचित्र असतात. एक दिवसाआड डायलिसिस सुरू आहे. अलोपॅथी आणि होमिओपॅथी असा कार्यक्रम सुरू आहे. ज्यादिवशी डायलिसिस सुरू असते त्यादिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी बराच त्रास होतो. त्रासाचा अटळ भाग म्हणून अंथरुणावर पडून रहावे लागते. प्रकृतीची क्षीणता एवढ्या टोकाला गेली आहे की, नव्याने किंवा पूर्वीप्रमाणे वाचन अशक्य झाले आहे. मेंदूला कोणतेही ओझे अजिबात चालत नाही. त्यामुळे जो जीवनक्रम आहे, त्यात दुःखसंपन्नता आहे. म्हणजे मी हतबल झालो आहे असे नव्हे. कुटुंबाची म्हणजे माझी पत्नी सौ. अंजलीची साथ देण्याची धमक अपूर्व आहे. जीवनाच्या गाभ्याविषयी तिला असलेली समज माझ्यापेक्षा कितीतरी पुढची आहे. सतत कोणता ना कोणता तरी विचार करण्याची सवय मला अडचणीची ठरली आहे. विचार करण्याने मनाच्या गरजा हा पैलू माझ्या कधी लक्षातच आला नाही. मन मारणे चांगले नाही, मनाला विवेकाची साथ आवश्यक आहे हे खरे असले तरी आत्मनियंत्रण सैल झाल्यास कठीण स्थिती येते. कळते पण वळत नाही ही ती स्थिती होय.

माझ्या मुलीच्या म्हणजे अस्मिताच्या मृत्यूनंतर प्रत्येक क्षणी अंतःकरणात प्रचंड अस्वस्थतता असते. कित्येकांना मी आधार दिला पण माझे दुःख मला झेपत नाही. अशावेळी जुन्या आठवणी, मैत्री नजरेसमोर उभी राहिली की मी अनावर होतो. शारिरिक त्रास असा असतो की, जेव्हा शरीर कासावीस असते तेव्हा तो त्रास सांगायला आवश्यक असलेली पूर्णता हरवून जातो. मानसिक त्रासाचे स्वरूप असे असते की,पोटात कालवाकालव होते. तरीही माझ्या पत्नीच्या जिद्दीवर वाटचाल सुरू आहे. तिलाही गुडघेदुखीचा त्रास आहे. माझी थोरली मुलगी अमृता आणि नात चार्वी स्कॉटलंडला असते. ती दररोज मला फोन करत असते. तिची घनव्याकुळता आपण सर्वजण समजू शकता. या सगळया वातावरणात वाचनात पडलेला खंड आणि लोकांमधली उठबस संपल्याचे शल्य टोकदार आहे.

आपला,
अनंत दीक्षित

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here