गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात आज पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली आहे. मरभीनटोला गावानजीक कोटगुलच्या जंगलात झालेल्या या चकमकीत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान (नक्षल चकमक) घातलं आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी याबाबत माहिती दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कोटगुल जंगल परिसरात आज शनिवारी सकाळी पोलिसांचे सी-६० पथक शोध अभियान राबवत होते. यावेळी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक सी-६० पथकावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत गोळीबार केला.
पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात २६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पोलिसांनी जिल्ह्यात नक्षलवाद्यांचं कंबरडं मोडण्यास सुरुवात केली आहे. कोटगुलच्या जंगलात फोनचे नेटवर्क नसल्याने जवानांशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे नक्की किती नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं, याबाबतची माहिती मिळत नव्हती. मात्र आता गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी माहिती दिली आहे.