हायलाइट्स:
- इंटरनेट सेवा ठप्प करण्याचा निर्णय
- शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाचं पाऊल
- पुढील तीन दिवसांपर्यंत ही सेवा बंद राहणार
त्रिपुरा हिंसाचारात विरोधात शुक्रवारी निघालेल्या मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर आज या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. सकाळी ९ वाजताच्या सुमारास या निषेध मोर्चालाही हिंसक वळण लागलं. समाज माध्यमांवर फिरणारे संदेश, व्हिडिओ आणि मिम्समुळे वातावरण आणखीनच चिघळण्याची शक्यता असल्याने अमरावती आयुक्तालय हद्दीतील सर्व इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांनी आपली इंटरनेट सेवा बंद केली आहे.
यासंदर्भात माहिती देताना पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलच्या प्रमुख सीमा दाताळकर म्हणाल्या की, सध्या समाज माध्यमांवर अनेक अफवा पसरवणारे मेसेज फिरत असल्याचं निदर्शनास आलं आहे. शहरातील परिस्थिती नियंत्रणात ठेण्यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व कंपन्यांना इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील तीन दिवसांपर्यंत ही सेवा बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, नागरिकांनी धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times