हायलाइट्स:
- कंगनाच्या वक्तव्यावरून देशभरातून संताप
- राजस्थानमध्ये तीन जिल्ह्यांत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
- कंगना राणावत कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता
- कंगनाने माफी मागावी, अशी केली मागणी
कंगनाविरोधात राजस्थानमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. अजमेर, जोधपूर आणि सिरोहीत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. तसेच आपल्या वक्तव्यामुळे तिने माफी मागावी, अशी मागणीही केली आहे.
कंगनाने नुकतेच एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले होते. ‘देशाला खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळाले आहे’, असे कंगना म्हणाली होती. कंगनाच्या या विधानावरून देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. तसेच काही ठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे. सरकारने तिच्याकडून ‘पद्म’ पुरस्कार परत घ्यावा, अशीही मागणी होत आहे. कंगनाविरोधात अजमेरच्या सिव्हिल लाइन आणि महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यात कंगनावर देशद्रोहाचा आरोप केला आहे. काँग्रेसच्या महिला नेत्या रागिनी चतुर्वेदी म्हणाल्या की, कंगनाच्या या वक्तव्यामुळे देशातील सर्व शहीदांचा अवमान झाला आहे. त्यामुळे कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे, माजी आमदार डॉ. राजकुमार जयपाल यांनीही सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
सिरोहीतही गुन्हा दाखल करण्याची मागणी
महिला काँग्रेस नेत्या हेमलता शर्मा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानेही सिरोहीत कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. कंगनाविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. जोधपूरमध्येही रोष व्यक्त केला जात असून, महिला काँग्रेस अध्यक्षांनी शास्त्री नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी कंगनावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times