हायलाइट्स:
- पत्रकार आणि आरटीआय कार्यकर्त्याचा मृतदेह आढळला
- बिहारच्या मधुबनीमध्ये धक्कादायक घटना उघडकीस
- चार दिवसांपासून बेपत्ता होता पत्रकार अविनाश झा
- एका गोणीत जळालेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
अविनाशने एका बोगस मेडिकल क्लिनिकसंबंधी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टनंतर तो बेपत्ता झाला होता. अविनाशच्या कामाच्या धडाक्यामुळे अनेक क्लिनिक बंद झाले होते. तर काहींना मोठा दंड भरावा लागला होता. पत्रकारिता करताना त्याला अनेकदा धमक्या मिळाल्या होत्या. तसेच लाखो रुपयांची लाच देण्याचे आमिषही त्याला दाखवण्यात आले होते. मात्र, त्याने आपले काम सुरूच ठेवले होते.
९ नोव्हेंबरला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसला होता
बुद्धिनाथ उर्फ अविनाश झा हा ९ नोव्हेंबरच्या रात्री १० वाजताच्या सुमारास घराजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला होता. त्याचे घर शहरातील पोलीस ठाण्यापासून अंदाजे ४०० मीटरवर असेल. घराजवळील गल्लीत मुख्य रस्त्यावर फोनवर बोलताना फेरफटका मारताना तो फुटेजमध्ये दिसत आहे. बेनीपट्टी पोलीस ठाण्याजवळ त्याला शेवटचं बघितलं होतं. त्यानंतर मात्र, त्याचा काहीच ठावठिकाणा नव्हता.
…तो परतलाच नाही
दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. त्याची दुचाकी आणि चावी त्याच्या क्लिनिकमध्येच होती. तो त्या क्लिनिकमध्ये काम करायचा. क्लिनिकचा गेट खुला होता. त्याचा लॅपटॉप सुरूच होता. रात्री तो काही कामानिमित्त बाहेर गेला असावा. मात्र, तो परत आलाच नाही, असे सांगितले जात होते. दुसऱ्या दिवशीही तो परतला नसल्याने कुटुंबीय चिंतेत होते. आजूबाजूचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना कळवले. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याचे मोबाइल लोकेशन ट्रेस केले. बेतौना गावात दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास त्याचा मोबाइल ऑन झाला होता. मात्र, पोलीस तिथे पोहोचल्यानंतर त्याच्याबद्दल ठोस माहिती मिळू शकली नाही.
अविनाश बेपत्ता झाल्याची माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे आजूबाजूच्या गावांतही खळबळ उडाली. १२ नोव्हेंबरला अविनाशच्या चुलत भावाला उडेन गावातील एका तरुणाला फोन आला. गावाजवळ हायवेजवळ एक मृतदेह सापडला आहे, अशी माहिती मिळाली. त्यानंतर कुटुंबीयांसह पोलीस प्रशासनही घटनास्थळी पोहोचले. रस्त्याच्या कडेला एका गोणीत भरलेला मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. कुटुंबीयांनी ओळख पटवली असून, तो मृतदेह अविनाशचा असल्याचे सांगण्यात आले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times