Kartiki Ekadashi 2021 : पंढरपूर : कोरोनाचं सावट आल्यानंतर पंढरीचे वारकारी काही वाऱ्यांपासून वंचित राहिले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानं यंदा कार्तिकी एकादशीचा सोहळा पार पडतोय. लॉकडाऊननंतर पंढरपूरची आषाढी वारी आणि कार्तिकी वारी (Kartiki Ekadashi 2021) यांवरही निर्बंध लादण्यात आले होते. पंढरपूर यात्रेची आस लागलेल्या वारकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यावर्षी कार्तिकी यात्रेला जिल्हाधिकाऱ्यांनी सशर्त परवानगी दिली आहे. नियम आणि अटींचं पालन करून आज 15 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. त्यामुळे गेली दोन वर्षे यात्रेची प्रतीक्षा करणाऱ्या वारकऱ्यांना यावेळी पंढरपूरच्या यात्रेला जाता येणार आहे. या यात्रेला किमान 5 ते 6 लाख भाविक येतील अशी अपेक्षा असून त्या दृष्टीनं दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. कार्तिकी वारीच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (Shri Vitthal Rukmini Temple) दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शासकीय महापूजा

आज कार्तिकी एकादशीकोरोनाच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच पंढरपूर (Pandharpur) विठुरायाच्या नामघोषानं दुमदुमून निघालं आहे. विठुरायाच्या पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या हस्ते आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातले वारकरी कोंडीबा देवराम टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई हे दाम्पत्य यावेळी मानाचे वारकरी ठरले. कोरोनामुळे गेल्या वर्षी कार्तिकी वारी होऊ शकली नव्हती. तब्बल दोन वर्षांनी कार्तिकी वारीचा सोहळा आज पंढरपुरात पार पडतोय. त्यामुळे वारकऱ्यांचे पाय पंढरपूरकडे वळलेत, असं असलं तरी एसटीच्या संपाचं सावट या यात्रेवर आहे आणि नेहमी एसटीनं पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांची संपामुळे गैरसोय झाली आहे. तरीही मिळेल त्या वाहनानं वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पुन्हा एकदा गजबजलं आहे.

आज कार्तिकी एकादशी निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यात आली. तसेच कोंडीबा देवराम टोणगे (वय 58) आणि त्यांच्या पत्नी प्रयाग बाई कोंडीबा टोणगे (वय 55) या नांदेड जिल्ह्यातील लोह तालुकामधील निळा या गावाच्या दाम्पत्याला मिळाला. मानाचे वारकरी कोंडीबा टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई टोणगे यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायाच्या गाभाऱ्याला आकर्षक सजावट करण्यात आली.

Kartiki Ekadashi 2021 : कार्तिकीनिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा; कोरोना प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच पंढरी दुमदुमली

नांदेडमधील निळा गावचं दाम्पत्य मानाचे वारकरी

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच आज कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला आहे. विठुरायाच्या पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातले वारकरी कोंडीबा देवराम टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई हे दाम्पत्य यावेळी मानाचे वारकरी ठरले. यावेळी कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांसोबत पूजा करण्याचा मान मिळालेले कोंडीबा टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई हे दाम्पत्य गेली 30 वर्षे पंढरपूरची वारी करत आहेत. टोणगे दाम्पत्य नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील निळा गावचे ते रहिवासी आहेत.

“कोरोना जाऊ देत, सुख-शांती नांदू दे”, कार्तिकी निमित्त टोणगे दाम्पत्याचं विठुरायाला साकडं

एबीपी माझाशी बोलताना टोणगे दाम्पत्य म्हणाले की, “गेली 30 वर्ष पंढरपूरची वारी करत आहोत. संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून दर्शन रांगेत उभे होतो. कोरोना प्रादुर्भावामुळे विठुरायाचं दर्शन घेता आलं नाही. त्यामुळे दर्शनाची आस होती. आषाढीलाही वारीला आलो होतो. पण दर्शन झालं नाही. त्यामुळे नामदेव पायरीचं दर्शन घेऊन गेलो होतो. कार्तिकी निमित्त देवाला एकच साकडं की, सुख-शांती नांदू देत आणि कोरोना निघून जाऊ देत.” प्रयागबाई टोणगे म्हणाल्या की, “दर्शनासाठी ज्यावेळी रांगेत उभे राहिलो तेव्हा अजिबात अपेक्षा नव्हती की, उपमुख्यमंत्र्यांसोबत देवाची पूजा करण्याचा मान मिळेल. देवाकडे कोरोना जाऊ देत आणि सर्वांना सुख मिळू देत, एवढंच मागणं आहे.”

कार्तिकीबाबत प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. कोरोना आणि इतर रोगराईचा धोका पाहून चंद्रभागेमध्ये वाहते पाणी ठेवण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला देण्यात आले आहेत. शहर आणि मंदिर परिसरात आरोग्याबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. यात्रेसाठी येणारे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी याशिवाय मंदिरात शासकीय महापूजेच्या वेळी हजर राहणाऱ्या सर्वांची RTPCR चाचण्या केल्या जाणार असल्याचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले. वारकऱ्यांचे निवासस्थळ असणाऱ्या 65 एकर भागाची सफाई पूर्ण झाली आहे. येथील 350 प्लॉटचे बुकिंग सुरु करण्यात आले आहे. एकंदर अजूनही शासनानं कार्तिकीबाबत कोणतीही घोषणा केली नसली तरी प्रशासनानं मात्र कार्तिकी होणार असल्याचं नोटिफिकेशन काढल्यानं यंदा कार्तिकी सोहळा लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणार ही वारकरी संप्रदायाला प्रशासनाकडून खास दिवाळी भेट ठरणार आहे.

कार्तिकीनिमित्त 24 तास दर्शन व्यवस्था सुरु

कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीतजास्त भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी देवाचे राजोपचार बंद करून 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. सहा तारखेला धुपारतीनंतर विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात आला आहे.  देवाचा पलंग निघतो म्हणजेच, देवाची रात्रीची विश्रांती बंद होत असते. आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. यातील जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर 24 तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसार विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो. यामुळे देवाची झोप बंद होते अशी प्रथा आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे पलंग निघत होता, मंदिरही 24 तास खुले राहायचे, मात्र मंदिरात भाविकांना प्रवेश नसायचा. यंदा कार्तिकी यात्रा होण्याची शक्यता असल्यानं कार्तिकी यात्रा काळात आजपासून 24 नोव्हेंबरपर्यंत लाखो भाविकांना 24 तास दर्शन मिळणार आहे.

65 वर्षांवरील भाविकांनाही पंढरपूरच्या मंदिरात दर्शन

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर दोन वर्षांनी पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरणार आहे. 65 वर्षांवरील भाविकांनाही पंढरपूरच्या मंदिरात दर्शन घेता येणार आहे. प्रशासनानं कोरोना काळातील निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात गर्भवती महिलांनाही दर्शनासाठी प्रवेश मिळणार आहे. कोरोना काळातील  निर्बंध शिथिल केल्यानं वारकऱ्यांकडून या निर्णयाचं जोरदार स्वागत होत आहे.कोरोनाच्या संकटानंतर होत असलेल्या कार्तिकी यात्रेसाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून भाविकांची यात्रा सुखरूप करण्यासाठी तब्बल साडे सात हजार अधिकारी आणि कर्मचारी झटत आहेत. यंदा ठाकरे सरकारने कार्तिकी यात्रा भरवण्यास परवानगी देताना 65 वर्षांपुढील वारकरी, गरोदर महिला आणि लहान मुलांसाठी असणारे निर्बंध उठविल्याने या सर्व घटकांना आता कार्तिकी यात्रेत सहभागी होता येणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here