हायलाइट्स:
- १९ वर्षीय तरुणीचा ट्रेनच्या डब्यात सापडला होता मृतदेह
- लटकलेल्या अवस्थेत आढळला होता तरुणीचा मृतदेह
- गुजरातमधील वलसाडमध्ये घडली होती घटना
- पोलिसांना मिळालेल्या डायरीतील मजकुरावरून पोलिसांनी व्यक्त केला संशय
वडोदरा पोलिसांच्या माहितीनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला गुजरातच्या वलसाडमध्ये एका १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह एक्स्प्रेसच्या डब्यात लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. त्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा संशय आहे. ती तरूणी वसतिगृहात जात असताना ही घटना घडली. गुजरातमधील नवसारीमध्ये राहणाऱ्या आणि वडोदरा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा मृतदेह वलसाडमध्ये एक्स्प्रेसच्या एका डब्यात लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर या घटनेची रेल्वे पोलिसांनी नोंद केली होती. ही तरूणी वडोदरा येथे एका वसतिगृहात राहत होती.
पोलिसांनी सांगितले की, तरुणीने एका डायरीत मजकूर लिहिला होता. त्या आधारे या तरूणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा संशय आहे. वडोदरामध्ये एका रिक्षातून दोन आरोपींनी तिचे अपहरण केले होते, तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. एका निर्जन ठिकाणी घेऊन गेल्याचा उल्लेख या डायरीत करण्यात आला होता. पोलीस महानिरीक्षक सुभाष त्रिवेदी यांनी सांगितले की, राज्य सरकारने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. तरूणीसोबत सामूहिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, याचा तपास करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दोषींना पकडण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
वडोदरा शहर पोलीस, अहमदाबाद शहर पोलीस गुन्हे शाखा, फॉरेन्सिक टीम आणि रेल्वे पोलीस कर्मचारी, अधिकारी अशा जवळपास २५ पथकांची स्थापना केली असून, ही पथके तपास करत आहेत. जवळपास साडेचारशे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस कॉल डेटा रेकॉर्डही तपासत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी प्राप्त झालेल्या गुप्त माहितीचाही वापर करत आहेत. वडोदरा शहर पोलीस, रेल्वे पोलीस, अहमदाबाद गुन्हे शाखेची सर्व पथके वेगवेगळ्या दिशेने तपास करत आहेत. कर्नाटकसारख्या अन्य राज्यांतही तपास केला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times