महाराष्ट्रातील राजकीय अपडेट्स: दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव (Rajeev Satav) यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव (Pradnya Rajeev Satav) यांना काँग्रेसकडून (Congress)  विधानपरिषदेच्या एका जागेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या जागेसाठी भाजपकडून या जागेसाठी औरंगाबाद भाजपा अध्यक्ष संजय किणेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत, असं देखील पाटील यावेळी म्हणाले. जुलै 2024 पर्यंत या विधानपरिषदेची मुदत आहे. या एका जागेची निवड आमदारांमधून होणार असल्यानं आणि महाविकास आघाडीकडे बहुमत असल्यानं काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात आहे.  जर या जागेवर निवड झाली तर राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या पत्नीकडे जाणार आहे.

ठरलं! विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून डॉ प्रज्ञा सातवांच्या नावावर शिक्कामोर्तब तर भाजपचाही उमेदवार ठरला

या रिक्त झालेल्या जागेसाठी काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, जितेंद्र देहाडे यांच्याही नावाची चर्चा सुरु होती. एकाच जागेसाठी निवडणूक असल्याने महाविकासआघाडीसाठी ही निवडणूक फारशी अवघड नाही. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर विधानपरिषदेसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी होती. 29 नोव्हेंबरला विधानपरिषदेच्या या एका जागेसाठी निवडणूक अपेक्षित आहे. 16 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.

रणपिसेंच्या निधनानं रिक्त जागेवर काँग्रेस अनुसूचित समाजालाच प्राधान्य देणार?

शरद रणपिसे यांच्या रुपानं अनुसूचित जातीचं नेतृत्व काँग्रेसनं विधानपरिषदेत दिलं होतं. त्यामुळे ही जागा या समाजालाच मिळावी असा तर्क करत काँग्रेसमध्ये काही इच्छुक सरसावले होते. माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, रमेश बागवे यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर नुकतेच जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्त झालेले जितेंद्र देहाडे हे इच्छुकांच्या शर्यतीत होते. विधानपरिषदेत रणपिसे काँग्रेसचे गटनेते म्हणून काम पाहत होते. त्यांच्या निधनानंतर परिषदेत अनुसूचित जातींचा एकही आमदार नाही, त्यामुळे ही जागा एससी समाजालाच मिळावी असा आग्रह काहींनी दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींकडे केल्याचं कळलं होतं

राज्यात विधानपरिषदेच्या माध्यमातून सातव कुटुंबाला भविष्यातल्या राजकारणासाठी ताकद दिली जाते का याचीही उत्सुकता होती. शेवटी प्रज्ञा सातव यांनाच संधी दिली गेली आहे.  या एका जागेची निवड आमदारांमधून होणार असल्यानं आणि महाविकास आघाडीकडे बहुमत असल्यानं काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात आहे. शरद रणपिसे यांच्या निधनानंतरची उर्वरित चार वर्षांची टर्म म्हणजे  27 जुलै 2024 पर्यंतची टर्म नव्यानं निवडून आलेल्या आमदारास मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here