हायलाइट्स:
- रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांना सूचना
- ‘रिझर्व्हेशन प्रणाली’ संबंधी महत्त्वाची सूचना जारी
- आठवडाभर सहा तासांसाठी रेल्वे रिझर्व्हेशन सेवा राहणार बंद
भारतीय रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी सेवा कोविड पूर्व स्तरावर सामान्य पद्धतीनं पोहचवण्यासाठी तसंच प्रवाशांना सामान्य सुविधा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय.
रेल्वे मंत्रालयानं रविवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार, प्रवाशांशी निगडीत सेवा सामान्य करण्यासाठी पॅसेंजर्स रिझर्व्हेशन सर्व्हिस येत्या आठवडाभार रात्रीच्या सहा तासांसाठी खंडीत राहील. रात्री ११.३० ते पहाटे ५.३० मिनिटांपर्यंत प्रवाशांना कोणतीही पॅसेंजर्स रिझर्व्हेशन सिस्टिम सर्व्हिस (PRS सेवा) उपलब्ध राहणार नाही.
पीआरएस सेवेत तिकीट रिझर्व्हेशन, तत्काळ बुकींग, तिकीट कॅन्सलेशन, माहिती सेवा इत्यादी सेवांचा समावेश होतो. त्यामुळे पुढचा जवळपास आठवडाभर प्रवाशांना रात्रीच्या सहा तासांत या सेवा उपलब्ध राहणार नाहीत. मात्र, सकाळी ५.३० नंतर या सेवा प्रवाशांना मिळू शकतील.
रेल्वे प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेच्या सर्व सेवा आता हळूहळू करोनापूर्वी स्थितीत परतत आहेत. याच साखळीत प्रशासनाकडून काही रेल्वेंना देण्यात आलेला ‘विशेष’ टॅगही हटवला आहे. यापुढे रेल्वेंचं संचालन त्यांच्या जुन्या रेल्वे क्रमांकावर आणि जुन्या तिकीट दरावरच केलं जाणार आहे. त्यामुळ आता रेल्वे क्रमांकात जोडला गेलेला ‘शून्य’ हा क्रमांक हटवण्यात आला आहे. तसंच करोना काळात रेल्वेच्या तिकीटदरांत करण्यात आलेली वाढही मागे घेण्यात आलीय. यासंबंधात गेल्या शुक्रवारीच आदेश जारी करण्यात आले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times