हायलाइट्स:
- नक्षलवाद्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे याचा खात्मा
- नक्षलवादी चळवळीसाठी मोठा धक्का
- गडचिरोली पोलिसांचं अभूतपूर्व यश असल्याची गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
‘मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे चकमकीत ठार झाला हे गडचिरोली पोलिसांचं अभूतपूर्व यश आहे. तेलतुंबडे याचा खात्मा झाल्याने महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा राज्यात शांती निर्माण होऊन या राज्याचा विकास वेगाने होईल,’ असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. गडचिरोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्र हद्दीतील मरदीनटोला नक्षलवाद्यांसोबत १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडे व चार मोठ्या नक्षल्यांसह एकूण २६ जणांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश मिळालं. या घटनेनंतर गडचिरोलीतील पोलीस अधिकार्यांचे आणि सी-६० दलाच्या जवानांचे अभिनंदन करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील सोमवारी गडचिरोलीच्या दौऱ्यावर आले होते.
यावेळी गृहमंत्र्यांनी मोहिमेत सहभागी असलेल्या सी-६० जवानांची भेट घेऊन त्यांचे कौतुक करत अभिनंदन केलं. मिलिंद तेलतुंबडे हा केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशासाठी मोस्ट वॉन्टेड नक्षली होता. त्यामुळे मोस्ट तेलतुंबडेचा खात्मा म्हणजे हे गडचिरोली पोलीस दलाचे अभूतपूर्व यश असून लगतच्या सर्व राज्यांना याचा फायदा होणार असल्याचं मत गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, आगामी काळातही या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी गडचिरोली पोलीस सर्वतोपरी योगदान देणार असल्याचंही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. नक्षलविरोधी कामगिरीत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याची ग्वाही वळसे पाटील यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times