हायलाइट्स:
- अमरावती हिंसाचारावर दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया
- नवाब मलिक यांच्या आरोपावरही केलं भाष्य
- कायदा-सुव्यवस्थेसाठी नागरिकांना केलं आवाहन
‘अमरावतीत ज्या दिवशी हिंसाचार झाला तेव्हा या ठिकाणचे पोलीस आयुक्त आणि पोलीस महानिरीक्षक सुट्टीवर होते. त्यामुळे आजुबाजूच्या विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तिथं पाचारण करण्यात आलं होतं. त्यानंतर अमरावतीतील जे पोलीस अधिकारी सुट्टीवर होते, त्यांची सुट्टी रद्द करत त्यांना कामावर हजर होण्याचे आदेश मी दिले होते. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे,’ अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
भाजप नेत्यावर आरोप; काय म्हणाले गृहमंत्री?
ज्या दिवशी हिंसाचार घडला तेव्हा मुंबईतील भाजपचा एक नेता दिवसभर रझा अकादमीच्या कार्यालयात बसून होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. या आरोपाबाबत विचारलं असता गृहमंत्री म्हणाले की, ‘याबाबत अद्याप माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. मात्र हा हिंसाचार कसा घडला आणि कोणी घडवला, याबाबत तपास करण्याचे आदेश मी दिले आहेत.’
‘नियमांचं पालन करा’
‘अमरावतीसह राज्यातील सर्वच जिल्ह्यांची स्थिती स्थिर राहावी, यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यात आली आहेत. काही ठिकाणी जमावबंदीचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे अशा परिसरात पाचपेक्षा अधिक लोकांना जमण्यास परवानगी नसते. मात्र असं असतानाही मोर्चे काढणं चुकीचं आहे. सर्वांनी नियमांचं पालन करायला हवं,’ असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times