हायलाइट्स:
- लग्न जवळ आले असताना मुलगी घर सोडून पळून गेली
- समाजात बदनामी होण्याच्या भीतीने वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल
- घराजवळ केली आत्महत्या, औरंगाबादमधील घटनेने हळहळ
ड्रायव्हर म्हणून काम करत असलेल्या ४८ वर्षीय वडिलांनी घराजवळच आत्महत्या केली. कुटुंबीयांची बदनामी होईल या भीतीने मृताने सुसाइड नोटमध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही. १९ नोव्हेंबरला त्याच्या मुलीचं लग्न होणार होतं. घरात आनंदाचं वातावरण होतं. लग्नाची पूर्ण तयारीही झाली होती. सर्व नातेवाइकांना लग्नाचे निमंत्रणही देण्यात आले होते. कॅटरिंगची व्यवस्थाही करण्यात आली होती.
मात्र, ऐन लग्न तोंडावर आले असताना, मुलगी घर सोडून निघून गेली. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र, ती कुठेही सापडली नाही. चिंतेत असलेल्या कुटुंबीयांनी सातारा पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. लग्न जवळ आलं असताना मुलगी घर सोडून गेल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण होते. हे दुःख सहन न झाल्याने आणि समाजात बदनामी होईल या भीतीने वडिलांनी शनिवारी रात्री टोकाचे पाऊल उचलले.
जवाहर नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांना या घटनेची माहिती मिळताच, ते घटनास्थळी पोहोचले. मृताच्या पँटच्या खिशातून त्यांना एक चिठ्ठी मिळाली. पत्नीच्या नावाने त्यांनी ही चिठ्ठी लिहून ठेवली होती. मी हे जग सोडून जात आहे. माझ्या मृत्यूनंतर मुलीला कधीच घरी येऊ देऊ नकोस. माझ्या मुलाचे लग्न धुमधडाक्यात करशील. तुझी कायम आठवणीत राहशील. मात्र, मुलीला माझ्या घरात कुठलीही जागा नाही, असे त्या चिठ्ठीत लिहून ठेवले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times