अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीत सध्या कडक संचारबंदी लावण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागाची परिस्थिती सध्या नियंत्रणात असून शांतता अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यातील अचलपूर, परतवाडा, कांडली, देवमाळी या परिसरात सायंकाळी सात ते सकाळी सात यादरम्यान संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. ही संचारबंदी पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार असल्यासं उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी सांगितलं आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड म्हणाले की, जिल्ह्यातील ग्रामीण भागाची परिस्थिती सध्या पूर्णतः नियंत्रणात आहे. मात्र काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अचलपूर तालुक्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. या कालावधीत पाचपेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र येण्यास परवानगी नाही. मात्र स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा (मेडिकल, दवाखाने) आदी सुरू ठेवण्याची मुभा असेल.
दरम्यान, नागरिकांनी कुठलेही व्हिडिओ आणि मेसेज पडताळणी केल्याशिवाय पुढे पाठवू नयेत, असं आवाहनही यावेळी ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने करण्यात आलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times