हायलाइट्स:
- गडचिरोली पोलिसांनी मोडलं नक्षलवादी चळवळीचं कंबरडं
- पोलीस दलास ५१ लाखांचे बक्षीस
- पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
गडचिरोली-छत्तीसगढच्या सीमेवर शनिवारी झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत सी-६० जवानांकडून २६ नक्षल मारण्यात आले. याबाबत त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आज एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं.
‘पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी ज्या अडचणी असतील त्या मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याशी चर्चा करुन सोडवल्या जातील. या कारवाईमुळे नक्षल चळवळीला जबरदस्त हादरा बसला आहे. तसंच या कारवाईमुळे देशभरात जे नक्षली संघटना आहेत त्यांनाही मोठा धक्का बसला आहे,’ असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
नक्षलविरोधी कामगिरी बजावणाऱ्या शहिदांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहणार असून त्यांच्या मागण्यांची शासन दखल घेणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. ‘नुकत्याच झालेल्या नक्षली चकमकीत नक्षलवादी मारले गेले त्यावेळी त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला अत्याधुनिक शस्त्रसाठा मी पाहिला असून अतिशय मोठ्या प्रमाणात नक्षली तेलतुंबडे याची सुरक्षा व्यवस्था असून सुद्धा त्याला मारण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलं हे कौतुकास्पद आहे. यामुळे महाराष्ट्रासह इतर नक्षलग्रस्त राज्यांमधील नक्षलींना धडा शिकवण्यात आपल्या राज्याला यश आलं आहे,’ असंही ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपस्थित पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं कौतुक केलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times