मुंबई: पुण्यात आजारावर उपचार घेत असलेला ओला चालक मुंबईचा नसून पुण्याचा रहिवासी असल्याची माहिती राज्याच्या साथरोग नियंत्रण संस्थेचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.

दुबईतून आलेल्या दाम्पत्याला मुंबईतून पुण्यात सोडणाऱ्या या ओलाचालकाची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत ओला चालकाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या ओलाचालकाने पुण्यातील दाम्पत्याला मुंबईहून पुण्यात सोडल्याने हा चालक मुंबईचा असल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळे मुंबईतही करोनाचा प्रवेश झाल्याची चर्चा होती. यापार्श्वभूमीवर डॉ. प्रदीप आवटे यांनी हा खुलासा केला आहे. हा पुण्याचा राहणारा असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, हा ओलाचालक पुण्याचा असला तरी मुंबई आणि पुण्यात तो ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आला, त्या सर्वांची तपासणी करण्यात येणार असून ओलाचालकाच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची तपासणीही करण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तर पालिकेनेसुद्धा या जोडप्यासोबत जे सहा प्रवासी प्रवास करत होते त्यांनाही टॅप केले आहे. त्यांना कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यांचे निदान चाचण्यांचे नमुने उद्या येतील असे अतिरिक्त आयुक्त डॉ.काकणी यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

दरम्यान, पुण्यात करोनाचे पाच रुग्ण आढळल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुण्यातील करोना रुग्णांबाबतची माहिती घेण्यात येणार असून या रुग्णांच्या संपर्कातील किती लोकांची तपासणी करण्यात आली याची माहिती घेण्यात येणार आहे. तसेच याच बैठकीत आयपीएलच्या आयोजनाबाबतचा मोठा निर्णय घेण्यात येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत असून टोपे यांनी तसे संकेतही दिले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here