हायलाइट्स:
- लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी राज्य सरकारचं नवं पाऊल
- अभिनेता सलमान खान याची घेणार मदत
- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती
‘राज्यातील अनेक भागात लसीकरणाचा वेग व टक्का वाढवण्यासाठी, विशेष करून मुस्लिम बहुल भागात लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी राज्य सरकार अभिनेता सलमान खान याची मदत घेणार आहे,’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
“लसीकरण न करून घेणाऱ्या मुस्लिम समाजातील लोकांपर्यंत लसीकरणाचे महत्व पोहचावे, त्यांचे काही गैरसमज असतील तर ते दूर व्हावे म्हणून ‘मिशन कवच कुंडल’ आणि ‘घर घर दस्तक’ या उपक्रमाद्वारे घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. असं असलं तरी मुस्लिम बांधवांची संख्या जास्त असलेल्या भागात करोना लसीकरण कमी प्रमाणात झालं असून ही संख्या वाढावी यासाठी धर्मगुरुंची मदत घेतली जाईल. तसंच सलमान खानसारख्या मोठा चाहतावर्ग असलेल्या अभिनेत्याचेही लसीकरणाबाबतचे व्हिडिओ तयार केले जातील,” असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात करोनाचा उद्रेक होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात रुग्णसंख्या वाढू नये यासाठी सर्वांनी लसीकरण करून घ्यावं, असं आवाहनही आरोग्यमंत्री टोपे यांनी केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times