हायलाइट्स:
- धान कापणी बघण्यासाठी गेलेल्या बहिणीवर वाघाचा हल्ला
- चंद्रपूर जिल्ह्यातील घटना
- वाघाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी
पोंभूर्णा वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या चेकहत्तीबोळी शेतशिवारात बोर्डा बोरकर येथील देवेंद्र कुनघाडकर यांचे शेत आहे. सध्या शेतात धान कापणी सुरू आहे. भाऊबीजेसाठी आलेली बहीण कांताबाई या शेतात धान कापणीचे काम बघण्यासाठी गेल्या. मात्र शेतात मजूर धान कापणीत गुंतले असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक कांताबाई यांच्यावर हल्ला केला.
वाघाच्या हल्ल्यानंतर कांताबाई यांनी आरडाओरड केल्यानंतर शेतातील मजुरांनी वाघाचा दिशेने धाव घेतली. मजुरांची गर्दी बघून वाघाने तिथून पळ काढला. मात्र या हल्ल्यात कांताबाई गंभीर जखमी झाल्या. गंभीर अवस्थेत त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभूर्णा येथे दाखल करण्यात आले.
दरम्यान, शेतात शिरलेल्या वाघाने महिलेवर केलेल्या हल्ल्यानंतर या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून हल्ला करणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात यावं, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times