हायलाइट्स:
- एनसीआरबीची धक्कादायक आकडेवारी समोर
- २० वर्षांत १८८८ जणांचे मृत्यू
- केवळ २६ पोलीस कर्मचाऱ्यांना शिक्षा
गेल्या २० वर्षांत पोलीस कोठडीत तब्बल १८८८ जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आलीय. अधिकृत आकड्यानुसार, या प्रकरणांत वेगवेगळ्या राज्यांतील ८९३ पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. यातील ३५८ जणांविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली. परंतु, गेल्या २० वर्षांत पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी केवळ २६ पोलीस कर्मचाऱ्यांना शिक्षा सुनावण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.
केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’द्वारे तयार करण्यात आलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आलीय.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार…
– २००६ मध्ये सर्वाधिक ११ पोलीस कर्मचारी दोषी आढळले होते. यातील सात जण उत्तर प्रदेशातील तर चार जण मध्य प्रदेशातील होते.
– २०२० साली पोलीस कोठडीत तब्बल ७६ मृत्यूंची नोंद करण्यात आली. यातील सर्वाधिक १५ प्रकरणं केवळ गुजरातमधील आहेत. मात्र, या प्रकरणांत गेल्या वर्षात कुणालाही शिक्षा झालेली नाही.
– या यादीत आंध प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरयाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचाही समावेश आहे.
– २०१७ सालापासून एनसीआरबीकडून पोलीस कोठडीतल मृत्यू प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांच्या अटकेचे आकडेही जारी करण्यात येत आहेत. गेल्या चार वर्षांत ९६ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी’ अटक करण्यात आलीय. यामध्ये गेल्या वर्षांच्या आकड्याचा समावेश नाही.
पोलिसांच्या ताब्यातील आरोपींची दोन गटांत विभागणी
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी जाहीर केलेल्या आकडेवारीत एनसीआरबीनं ‘पोलिसांच्या ताब्यात / कोठडीत मृत्यू’ प्रकरणांना दोन भागात विभागलंय. रिमांडवर घेतलेल्या व्यक्ती आणि रिमांडवर न घेतलेल्या व्यक्ती अशा दोन गटांचा यात समावेश आहे.
ज्यांना अटक करण्यात आलीय मात्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं नसेल अशा व्यक्ती रिमांडवर न घेतलेल्या व्यक्ती असतात तर दुसऱ्या गटात पोलिसांनी न्यायालयाच्या निर्देशानंतर ताब्यात घेतलेल्या व्यक्तींचा समावेश होतो.
एनसीआरबीच्या माहितीनुसार, २००१ सालापासून ‘रिमांडवर घेण्याअगोदरच’ ११८५ व्यक्तींच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय. तर ७०३ जणांचा मृत्यू पोलिसांनी ‘रिमांडवर’ ताब्यात घेतल्यानंतर झाल्याचं आकडेवारी दर्शवतेय.
गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीनुसार, पोलीस कोठडीतील ८९३ मृत्यूंपैंकी ५१८ अशी प्रकरणं आहेत, ज्यात व्यक्तीला रिमांडवर घेतलं गेलं नव्हतं.
उत्तर प्रदेशातील कासगंजचं ताजं उदाहरण
नुकतंच, उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये २२ वर्षीय अल्ताफ नावाच्या तरुणाचा पोलिसांच्या ताब्यात असताना संदिग्ध परिस्थितीत मृत्यू झाल्याचं समोर आलंय. यावरून गदारोळ सुरू असताना एनसीआरबीची ही आकडेवारी समोर आलीय.
मृत अल्ताफ अल्ताफविरोधात एका अल्पवयीन हिंदू मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवण्यात आली होती. याच प्रकरणात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. मात्र, पोलीस स्टेशनमधल्या बाथरुममधल्या नळाच्या पाईपला लोंबकळून अल्ताफनं आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे तर पोलिसांच्या छळामुळे अल्ताफचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केलाय. या प्रकरणात बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times