हायलाइट्स:
- लग्नाच्या हॉलमधील खोलीत बाथरूममध्ये आढळला तरूणीचा मृतदेह
- उत्तर प्रदेशातील मेरठ येथील भावनपूर येथील घटनेने खळबळ
- खोलीत बेडवर पोलीस कॉन्स्टेबल दारूच्या नशेत सापडला
- हत्येचा गुन्हा केला दाखल, पोलिसांनी तपास केला सुरू
मेरठच्या भावनपूर येथील दतावली रोडवर एका मंगल कार्यालयात लग्नसोहळा सुरू होता. त्याचवेळी सोमवारी रात्री उशिरा लग्नसोहळ्याला आलेली एक तरूणी बेपत्ता झाली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मंगल कार्यालयातील सर्व खोल्यांमध्ये तिचा शोध घेतला. त्यातील एका खोलीचा दरवाजा बंद होता. दरवाजा उघडला असता, शामली येथील रवी नावाची व्यक्ती खोलीतील बेडवर मद्यधुंद अवस्थेत पडला होता. तो पोलीस कर्मचारी आहे. तर तरूणी बाथरूममध्ये पडली होती. तरूणीला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.
मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद
तरूणीच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त करत रवी याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मंगल कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे सीसीटीव्ही फुटेज दाखवावेत, असा आग्रह धरला. मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे, मंगल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तरूणीच्या नातेवाइकांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी वातावरण तणावाचे होते. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तरुणीचा मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला.
मेरठचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रभाकर चौधरी यांनी सांगितले की, ज्या खोलीतील बाथरूममध्ये तरूणीचा मृतदेह आढळून आला, त्या खोलीतील बेडवर एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत सापडली. ती व्यक्ती पोलीस कॉन्स्टेबल आहे. एक अन्य व्यक्तीही लग्नसोहळ्यातून बेपत्ता झाला आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times