हायलाइट्स:
- जिल्हा नियोजन समितीची बैठक पुन्हा ठरली वादळी
- नारायण राणे आणि शिवसेना नेत्यांमध्ये बैठकीत संघर्ष
- तब्बल ९ महिन्यांनंतर झालेल्या बैठकीत राजकीय वाद
या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते व माजी मंत्री दीपक केसरकर असे दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. त्यामुळे राणे विरुद्ध सेना असा सामना रंगणार हे नक्की होतं. बैठकीच्या सुरुवातीलाच जिल्हा नियोजनाच्या निधी वाटपावरून नारायण राणे यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
जिल्हा नियोजन मंडळातील सदस्य आणि नारायण राणे यांच्यात विविध मुद्द्यांवर खटके उडत होते. राणे यांनी एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीचा हवाला देत पक्ष प्रवेश करणाऱ्यांना सरकारी निधी मिळतो का, असा सवाल केला. त्यावरून सेनेच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. नारायण राणेंना हा प्रश्न विचारण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे राणेंचा संयम सुटला आणि ते भडकले. त्यांनंतर भाजपचे आमदार नितेश राणेही आक्रमक झाले. मात्र नियोजन मंडळाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी बाजू सावरून घेत यावर उत्तर दिलं आणि वादावर पडदा टाकला.
नोव्हेंबर महिन्यात फक्त ९ टक्के विकासाचा निधी खर्च झाला आहे. जिल्ह्याचा विकासाचा फंड कमी होत चालला आहे, असं सांगत सरकारमुळे ग्रामीण विकासाला खिळ बसल्याचा आरोप नारायण राणेंनी केला. जिल्हा नियोजन बैठकीत सत्ताधारी बचावात्मक भूमिकेत असल्याचं पाहायला मिळालं. जिल्हा परिषदेचे ४६ कोटी धमकी देवून मागे घेतले, असा आरोपही नारायण राणेंनी केला. एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिल्हा नियोजन बैठक नारायण राणे आणि शिवसेना नेत्यांच्या वादामुळे चांगलीच गाजल्याचं पाहायला मिळालं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times