करोना विषाणूच्या संसर्गामुळं जगभरात चार हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच देशभरात आतापर्यंत ६० जणांना करोनाची लागण झाली आहे. आता हा जीवघेणा करोना मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातही धडकला आहे. त्यामुळं भीतीचं वातावरण आहे. पुण्यात आठ आणि मुंबईत दोन रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. आणखी काही संशयित रुग्णांचे चाचणी अहवाल यायचे आहेत. त्यामुळं हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. पुण्यात करोनाची लागण झालेल्या रुग्णांपैकी एकाच्या कुटुंबावर त्याच्या सोलापूरमधील मूळ गावातील गावकऱ्यांनी बहिष्कार घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आम्हाला सुद्धा हा आजार होईल अशी भीती व्यक्त करतानाच, तुम्ही गाव सोडून जा, असं गावकऱ्यांनी त्यांना सांगितलं.
दरम्यान, या धक्कादायक प्रकारानंतर रुग्णाच्या कुटुंबीयांनी वकिलांमार्फत पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर ती तक्रार सायबर सेलकडे वर्ग केली आहे, असं सांगण्यात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times