परंपरागत भीक मागण्याचा मार्ग नाकारून शिक्षणाच्या पायवाटेने कसरत करत नाथपंथी डवरी समाजातून पहिला पीएच. डी. धारक होण्याचा मान मिळवणारे, ख्यातनाम विचारवंत बुद्धीवादी प्रा. डॉ. नारायण भोसले यांना त्यांच्या सामाजिक कार्यसाठी ‘नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार २०२०’ जाहीर करण्यात आला आहे. तर भूमिहीन शेतकरी, आदिवासी कामगार वर्गाला संघटीत करून त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी २१व्या शतकातील सर्वात लक्षणीय असा लाँग मार्च काढून या सर्व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचं काम केल्याबद्दल डॉ. अजित नवले यांना ‘समष्टी उलगुलान पुरस्कार २०२०’ जाहीर झाला आहे. तसेच लेखन आणि उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल ‘रावण’ या लोकप्रिय संशोधन कादंबरीचे लेखक शरद तांदळे यांना ‘समष्टी गोलपीठा युवा पुरस्कार २०२०’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
प्रथम दोन पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम २५ हजार व मानपत्र असे असून गोलपीठा युवा पुरस्काराची रक्कम ५ हजार रुपये व मानपत्र अशी असणार आहे. या पुरस्काराचे वितरण ‘ सारं काही समष्टीसाठी’ या कार्यक्रमात होईल. हा कार्यक्रम १४ आणि १५ मार्च रोजी विद्यानगरी, मराठी भाषा भवन, मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी एकूण ४ नाटके, १४ लघूपट, ३ चर्चासत्रे, कविता वाचन, असे परिपूर्ण कार्यक्रम होणार आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times