हायलाइट्स:
- ड्रग्ज कारखान्याच्या मालकाबाबत महत्त्वाची माहिती उघड
- हायकोर्टात वकिलीची प्रॅक्टिस करणारा निघाला ड्रग्ज कारखानदार
- फरार आरोपीचा शोध सुरू
अमली पदार्थ विरोधी कक्ष विभागाचे पोलीस उपायुक्त दत्ता नलवडे यांनी गुन्ह्याची माहिती दिली. मुंबईतील खैराणी रोड, साकीनाका येथे मॅगलिन नावाची महिला एम.डी विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी परिसरात सापळा रचून संबधित महिलेची पंचासमक्ष झडती घेतली असता तिच्याजवळ ५० ग्रॅम एम.डी अंमली पदार्थ मिळून आले.
पोलिसांनी महिलेकडे कसून चौकशी केली असता हे अमली पदार्थ ढोलगरवाडी येथील व्यक्तीने दिले असून त्याचा एम.डी. बनवण्याचा कारखाना असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुतार, दहिफळे, सपोनि वहिदा पठाण, फौजदार पवळे यांनी ढोलगरवाडी येथील फार्महाऊसवर चंदगड पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. त्या ठिकाणी निखिल रामचंद्र लोहार हा ढोलगरवाडीचा व्यक्ती नोकरी करत असल्याचं आढळून आले. रामकुमार राजहंस याने फार्महाऊसची देखरेख करण्यास नोकरीस ठेवल्याचं त्यानं सांगितलं आहे.
फार्म हाऊसमध्ये पोलिसांना एम.डी. तयार करण्याचा कच्चा माल मिळाला आहे. पोलिसांनी कोल्हापुरातील फॉरेन्सिक लॅब येथील रासायनिक विश्लेषक आणि त्याच्या पथकाने एम.डी. बनवण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने, काचेची उपकरणे, १२२ ग्रॅम एम.डी. आणि एमडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा ३७ किलो ७०० ग्रॅम वजनाच्या कच्चा मालाची तपासणी करुन तो जप्त केला.
गेली अनेक वर्षे हा कारखाना सुरू असल्याचं तपासात पुढे आलं आहे. ड्रग्जचा कारखाना लक्षात येऊ नये म्हणून तिथे पोल्ट्रीफार्म आणि गोठा चालवत असल्याचं भासवलं जात होतं. फार्म हाऊस मालक राजकुमार राजहंस हा अमली पदार्थ तयार करत असल्याचं तपासात स्पष्ट झालं. पोलिसांनी निखिल लोहारला अटक केली असून राजकुमार राजहंसचा शोध घेतला जात आहे. राजकुमार राजहंस मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात ड्रग पेडलरना एम.डी. विक्री करत होता हे चौकशीत निष्पण्ण झालं आहे.
राजकुमार राजहंसची हायकोर्टात वकिली
राजकुमार राजहंस हा मुंबई हायकोर्टात प्रॅक्टिस करत असल्याची माहिती पुढे आली आहे. तो अटक केलेल्या ड्रग पेडलरांच्या केसेस चालवत होता असे कळते. पण महिला पेडलरला अटक केल्यानंतर तो गायब झाला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times