हायलाइट्स:
- मालधक्क्यावर ट्रकमधून वॅगनमध्ये पोती उतरवताना तरुणाचा मृत्यू
- विजेचा धक्का लागल्याने घडली दुर्घटना
- कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर
ट्रकमधील पोत्यांवर झाकलेल्या ताडपत्रीच्या वरून गेलेल्या विद्युत तारांना स्पर्श झाल्याने ही दुर्घटना घडली. मिरज पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी मिरज रेल्वे जंक्शनच्या सांगलीतील रेल्वे माल धक्क्यावर ट्रकमधून पोती उतरवण्याचं काम सुरू होतं. प्रकाश सरगर हा हमाल ते काम करत होते. दुपारच्या सुमारास ट्रक वॅगनच्या जवळ लावून पोती वॅगनमध्ये उतरवण्याचं काम सुरू होतं. पोती वॅगनमध्ये भरताना ट्रकमधील ताडपत्री अचानक वरच्या उच्चदाब वाहिनीच्या तारांवर गेली. त्यामुळे झालेल्या स्फोटात सरगर हे होरपळून खाली फेकले गेले.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते बेशुद्ध पडले होते. दुर्घटनेचा प्रकार लक्षात येताच आजुबाजूला असलेल्या हमालांनी घटनास्थळी धाव घेतली. सरगर यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
मृत प्रकाश सरगर यांना ६ वर्षाचा मुलगा व ३ वर्षाची मुलगी आहे. या आकस्मित घडलेल्या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ट्रक आणि वॅगनच्या वरून रेल्वेची उच्च दाबाची वीजेचे तार गेली होती. रेल्वे प्रशासनाने वॅगनमध्ये पोती उतरवत असताना विजेचा प्रवाह बंद का केला नाही, असा सवाल हमालांनी उपस्थित केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times