हायलाइट्स:
- साई संस्थानला कोट्यवधी रुपयांचा फटका
- संस्थानला साधारण ३०० कोटी रुपयांचं नुकसान
- पैशांमध्ये घट झाल्याने साईबाबा संस्थानची तारेवरची कसरत
कोव्हिड संकटापूर्वी दररोज ५० ते ६० हजार भाविक साई समाधीचे दर्शन घ्यायचे. त्यावेळी दक्षिणा हुंडी, देणगी, सोने-चांदी आणि ऑनलाईनच्या माध्यमातून दिवसाला सरासरी एक ते सव्वा कोटी रुपये दान प्राप्त होत होते. लॉकडाऊनमध्ये मंदिर बंद असल्याने साई संस्थानला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाच्या आदेशाने ७ ऑक्टोबरपासून साई मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. मात्र दर्शन मर्यादा केवळ १५ हजार ठेवण्यात आली होती.
दिवाळी सुट्टीच्या काळात साई संस्थानच्या तिजोरीत कोट्यवधी रुपये दान स्वरूपात जमा झाले असले तरी मागील एक महिन्याचा विचार केला तर दिवसाला सरासरी ३५ ते ४० लाख रुपये दान प्राप्त होत आहे.
दान स्वरुपात मिळणाऱ्या पैशांमध्ये घट झाल्याने साईबाबा संस्थानला तारेवरची कसरत करावी लागत आहे. संस्थानामध्ये कंत्राटी आणि कायम स्वरूपी असे ४००० कर्मचारी आहेत. दोन धर्मादाय हॉस्पिटल आहेत. एका हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार केले जातात तर साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अल्पदरात उपचार केले जातात. साई प्रसादालयात मोफत भोजन, दर्शन रांगेत मोफत बुंदी प्रसाद, अल्पदरात निवास व्यवस्था, तसंच अत्यल्प दरात शिक्षणाची सोय देखील केली जाते.
राष्ट्रीय आपत्तीवेळी साई संस्थान मोठ्या प्रमाणात मदत देते, तर कोव्हिड संकटात संस्थानने रुग्णांवर मोफत उपचार सुरू ठेवले आहेत. या सर्व गोष्टींवर साई संस्थानच्या दानाचा विनियोग केला जातो. करोना संकटामुळे कोट्यवधींचा आर्थिक फटका बसला असला तरी दर्शन मर्यादा १५ हाजारांहून २५ हजार करण्यात आल्याने परिस्थिती पुन्हा सुधारेल असा विश्वास साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी व्यक्त केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times