हायलाइट्स:
- समलिंगी पार्टनरची हत्या, ३१ वर्षीय तरुणाला अटक
- अहमदाबाद गुन्हे शाखेने केली कारवाई
- समलिंगी संबंधांवरून करत होता ब्लॅकमेल
- सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्सवरून पोलिसांना सापडले धागेदोरे
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद जिल्ह्यातील दस्करोई तालुक्यातील एका गावात आरोपी राहतो. तो मजूर आहे. तो ६३ वर्षीय व्यक्तीच्या संपर्कात आला होता. त्याचे आचेरमधील ठाकोरवासमध्ये आणखी एक घर होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते दोघे संपर्कात आले. त्यांच्यात गप्पा रंगू लागल्या. त्यानंतर ६३ वर्षीय व्यक्तीने त्याच्यासोबत संबंध ठेवण्याबाबत विचारणा केली. त्यानंतर वर्षभरापूर्वी दोघांची पाच वेळा भेट झाली. या भेटीत त्या दोघांमध्ये अनैसर्गिक संबंध प्रस्थापित झाले.
पोलिसांनी सांगितले की, जवळपास २० दिवसांपूर्वी ६३ वर्षीय व्यक्तीने तरुणाला फोन केला आणि संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. त्याला आपला ‘अॅक्टिव्ह पार्टनर’ बनण्यासाठी त्याला ब्लॅकमेल करू लागला. मात्र, तरुणाने त्याला नकार दिला. मात्र, ६३ वर्षीय व्यक्तीने त्याला ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवले. त्याने तरुणाच्या घरी जाऊन संबंधांबाबत सांगणार आहे असे सांगितले. तसेच काही त्यांचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. यावरून त्याला राग आला आणि त्याची हत्या करण्याचा कट आखला. मंगळवारी दुपारी तरुणाने त्या व्यक्तीला फोन केला आणि आचेरमधील घरी भेटायचे असल्याचे सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी त्याच्या घरी पोहोचला. त्यावेळी त्या व्यक्तीने त्याच्यावर पुन्हा दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावर त्या व्यक्तीने तरुणाला जमिनीवर ढकलले. त्यावर तरूणाने हातातील चाकूने त्या व्यक्तीवर हल्ला केला. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तरुणाने त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मोबाइल फोन घेऊन पळ काढला. त्यानंतर एका ज्वेलर्समध्ये जाऊन सोन्याची चेन विकली. या घटनेनंतर गुन्हे शाखेने तपास सुरू केला. पोलिसांनी साबरमती परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तरूणाला ताब्यात घेतले. चौकशी केली असता, त्याने हत्येची कबुली दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तरुणाला अटक केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times