हायलाइट्स:
- मुख्यमंत्री अशोक गहलोत गट विरुद्ध सचिन पायलट गट
- तीन मंत्र्यांनी सोपवला राजीनामा
- आज सायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक आयोजित
यापूर्वी तीन कॅबिनेट मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला आहे तसंच हे राजीनामे मुख्यमंत्र्यांकडूनही स्वीकारण्यात आले आहेत. शिक्षण मंत्री गोविंद सिंह डोटसरा, आरोग्य मंत्री रघु शर्मा आणि महसूल मंत्री हरीश चौधरी यांचा राजीनामा देणाऱ्यांत सहभाग आहे. या तीनही मंत्र्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना एक पत्र लिहून राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली होती.
उल्लेखनीय म्हणजे, राजीनाम्याची घोषणा राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांनी केली नाही तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी यासंबंधी अधिकृत माहिती दिली. राजस्थान काँग्रेस प्रभारी अजय माकन काल सायंकाळी अचानक जयपूरमध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची कुणकुण सुरू झाली होती. ‘गहलोत सरकारच्या तीन मंत्र्यांनी राजीनामा सोपवला असून त्यांची पक्षासाठी काम करण्याची इच्छा असल्याचं’ म्हणत माकन तीन मंत्र्यांच्या राजीनाम्याची माहिती दिली.
मात्र, मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या सत्ता संघर्षात या तिघांच्या खुर्च्या गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून सचिन पायलट गट आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत गटांतील संघर्ष वेगवेगळ्या निमित्तानं समोर येत राहिलाय. पायलट गटाकडून सत्तेत आपल्याला अधिक संधी मिळण्याची मागणी केली जातेय. याच संदर्भात मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
तीन मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता मंत्रिमंडळात १२ नव्या मंत्र्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे लवकरच गहलोत सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा होण्याची शक्यता आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times