हायलाइट्स:
- महागड्या कार चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
- दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, चौघांना केली अटक
- रॅकेट दुबईतून चालवले जात असल्याची माहिती उघड
- आरोपींकडून २१ अलीशान कार केल्या जप्त
अबिद (वय ३०), सगोलसेम जॉन्सन सिंह (वय ३२) आणि मोहम्मद असिफ (वय ३३) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अबिद हा ड्रायव्हर असून, तो चोरलेल्या महागड्या कार इंफाळ आणि सिलिगुडीमध्ये न्यायचा. तर सिंह हा देखील चोरलेल्या इंफाळमध्ये विकायचा. असिफ हा मेरठमधून कार चोरी करायचा. सलमान (वय ३०) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. तो असिफकडून चोरलेल्या कार घ्यायचा आणि त्याचे चेसीस आणि इंजिन नंबर बदलायचा, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेल्या २१ महागड्या कार जप्त केल्या आहेत. या चोरलेल्या वाहनांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. मणिपूर आणि इंदूरमधून चोरीला गेलेल्या वाहनांची माहिती द्यावी, अशी सूचना पोलिसांनी परिवहन विभाग आणि विमा कंपन्यांना दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद इखलाक याने ३ ऑक्टोबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. कृष्णा नगरमध्ये त्याने आदल्या दिवशी त्याची कार पार्क केली होती. ती चोरीला गेली होती. पोलिसांनी तपास केला असता, उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील अबिदचं नाव पुढे आलं. पोलिसांनी त्याला दिल्लीच्या उत्तम नगरमधून अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने टोळीचं नावही सांगितलं. या टोळीनं १५ कार चोरी केल्याची माहिती पुढे आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अबिदने चौकशीत सांगितले की, त्याला काश्मिरी गेटवर आमिर, सफर आणि सिकंदर यांच्याकडून एक कार देण्यात आली. त्याने ती इंफाळमधील सिंह आणि विद्यासुंदर या दोघांकडे दिली. त्यांचा ‘बॉस’ आणि टोळीचा म्होरक्या सरिक सट्टा याने त्याला तसे सांगितले होते. तो दुबईहून हे रॅकेट चालवतो. पोलिसांनी असिफला मेरठमधून अटक केली. त्याने ही कार इंदूरमधील सलमानला विकली, अशी माहिती पोलिसांनी दिली. इंफाळच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने दिल्ली पोलिसांनी सिंह याला अटक केली. त्याच्याकडून इंफाळच्या परिसरातून १४ अलीशान कार जप्त करण्यात आल्या. या कार दिल्ली-एनसीआर परिसरातून चोरी केल्या होत्या. दुसऱ्या पथकाने इंदूरमधून सलमानला अटक केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times