हायलाइट्स:
- महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवर संघर्ष
- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यावर शिवसेनेचे टीका
- निलेश लंके कसा करणार पलटवार?
शिवसेनेने शनिवारी तालुक्यात मेळावा आयोजित केला होता. यामध्ये विरोधकांपेक्षा महाविकास आघाडीचा भाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यावरच अधिक टीका करण्यात आली. ‘पुढील काळात राज्यात महाविकास आघाडी होईल की नाही हे माहीत नाही, मात्र पारनेर तालुक्यात आम्ही घडाळ्याला मत द्या, असं कोणालाच सांगणार नाही. लोकप्रतिनिधींनी संधीचं सोने करायचं असतं. पारनेरमध्ये मात्र गेल्या दोन वर्षांत संधीचं लोखंड केल्याचं पाहायला मिळालं,’ अशी टीका विजय औटी यांनी आमदार लंके यांच्यावर केली आहे.
राज्यातील नगर पंचायतींच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामध्ये पारनेरचाही समावेश आहे. त्यामुळे तालुक्यात राजकीय हालचालांनी वेग आला आहे. पारनेरमध्ये औटी आणि लंके यांच्यात मागील निवडणुकीपासून राजकीय वैर आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतरही ते कमी झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मेळावा झाला. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर, जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, सभापती गणेश शेळके, तालुकाप्रमुख विकास रोहकले, पंचायत समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर विजय औटी बंडखोरी करणार?
या कार्यक्रमात बोलताना औटी म्हणाले की, ‘आगामी निवडणुकांत राज्य पातळीवर आघाडीसंबंधी काय निर्णय होईल याची कल्पना नाही, मात्र पारनेर तालुक्यात घड्याळाला मत द्यायला सांगायला आम्हाला जमणार नाही. एखादा लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर त्याला या संधीचे सोने करता येते. पारनेर तालुक्यात मात्र गेल्या दोन वर्षांत लोकप्रतिनिधीने संधीचं लोखंड केल्याचं पाहायला मिळते. सामान्य माणूस भरडला जात असेल, कार्यकर्त्यांवर अन्याय होणार असेल तर या वयातही रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची माझी तयारी आहे. हिंमत असेल तर समोरासमोर युक्तीवाद करायला यावे. गेल्या १५ वर्षांत शिवसैनिकांचा संच मी सांभाळला. राजकारणात उलथापालथ होत असते. मी काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. माझे वडील आमदार होते. पत्नीही विविध पदांवर होती. जनतेने आमच्या कुटूंबावर प्रेम केले. पारनेर तालुक्यात जनतेला वेगळ्या पद्धतीने नेण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. जिल्हा दूध संघावर प्रतिनिधी नेमण्यात आले, त्यावेळी शिवसेनेचा प्रतिनिधी घेतला नाही. जिल्हा बँकेतही शिवसेनेला संधी दिली गेली नाही. आमच्यासोबत असं होणार असेल तर आम्हालाही शंकरराव गडाख यांनी बॅट घेतली त्याप्रमाणे हाती तलवार घ्यावी लागेल,’ असं सांगून वेळप्रसंगी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेतही औटी यांनी दिले आहेत.
‘…म्हणून शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जावं लागलं’
मागील काळात आपल्यावर अन्याय झाल्याचं सांगताना औटी म्हणाले, ‘मागील सरकारमध्ये पहिला अन्याय माझ्यावरच झाला. नैसर्गिक निर्णय प्रक्रियेप्रमाणे तीन महिन्यांत माझ्याकडे विधानसभेचे उपाध्यक्षपद येणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. प्रादेशिक पक्ष संपविण्याचं धोरण भाजपने अवलंबण्यास सुरुवात केली. त्यामुळेच भाजप सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन्याचा निर्णय घ्यावा. त्या सर्व प्रक्रियेचा मी जवळचा साक्षीदार आहे,’ असंही औटी म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times