शिवसेनेने राज्यसभेसाठी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यसभेची उमेदवारी आपल्याला मिळेल अशी चंद्रकांत खैरे यांची अपेक्षा होती, पण त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे ते कमालीचे नाराज झाले आहेत. प्रियंका चतुर्वेदी यांना शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केल्याबद्दल खैरे यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता ते बोलत होते. खैरे म्हणाले,‘मी माझ्यासाठी खासदारकी मागत नव्हतो, औरंगाबाद शहराला शिवसेनेच्या खासदाराची आवश्यकता होती, परंतु यांना हे आवडले नाही. मी शिवसैनिक म्हणून काम करीत राहणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मी सच्चा शिवसैनिक आहे. त्यांच्याबरोबर मी अनेक वर्षे काम केले आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर देखील काम केले आहे. आता नवीन लोकांना संधी द्यावी असे त्यांना वाटत आहे. राज्यसभेत काम करण्याची संधी मिळाली असती, तर लढायला बळ मिळाले असते. मी मरेपर्यंत शिवसैनिक राहीन आणि काम करीन. बाकीचे येतात आणि जातात.’
विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करुन खैरे म्हणाले, या निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांना आणले गेले, पण शिवसेनेला हव्या तितक्या जागा मिळाल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांनी एकटे असताना शिवसेनेच्या ६७ जागा जिंकल्या होत्या, प्रशांत किशोर यांना आणून देखील यावेळी जागा तुलनेने कमी आल्या. आपण वीस वर्षे लोकसभा गाजवली, कधीच इकडे-तिकडे गेलो नाही, अनेक ऑफर होत्या पण त्याचा कधीच विचार केला नाही. प्रियंका चतुर्वेदी खूप चांगलं काम करतील, त्या हिंदी बोलतात, इंग्रजी बोलतात असा टोमणा देखील खैरे यांनी लगावला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times