मुंबई: राज्यात आज दिवसभरात तीन करोनाबाधित रुग्ण सापडले. ठाण्यात पहिलाच रुग्ण सापडला आहे. तो ३५ वर्षांचा आहे. फ्रान्सहून तो परत आला आहे. तर पुण्यातही एका ३३ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. हिंदुजा रुग्णालयात दाखल असलेला आणि दुबईहून परत आलेल्या ६४ वर्षीय व्यक्तीलाही करोनाचा संसर्ग झाल्याचं चाचणी अहवालातून स्पष्ट झालं.

राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १४ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. तर सूत्रांच्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्येही तिघांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा १७ वर पोहोचला आहे. सर्व करोनाबाधित रुग्णांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरू आहे. आज राज्यात एकूण ५० नवीन संशयित भरती झाले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

१२ मार्चपर्यंत , पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत १२९५ विमानांमधील १ लाख ४८ हजार ७०६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार, सर्व देशांहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी राज्यातील या ३ विमानतळांवर करण्यात येत आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशनद्वारे इराण, इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशांत सध्या करोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाल्याने, २१ फेब्रुवारीनंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण ६८५ प्रवासी आले आहेत.

१८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३९९ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी सर्व ३१७ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत; तर १४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या ५१ जण पुणे येथे, तर २७ जण मुंबईत भरती आहेत. या शिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयातही संशयित रुग्ण भरती आहेत.

राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले असून, राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ खाटा उपलब्ध आहेत. करोनाचा फैलाव झालेल्या देशांतून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here