भोपाळः भाजपमध्ये प्रवेश करून ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसला आव्हान दिले आहे. आता मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या मुख्यमंत्री सरकारनेही ज्योतिरादित्यांना अडचणीत आणण्याची तयारी सुरू केली आहे. मध्य प्रदेशातील जमीन घोटाळ्या प्रकरणी ज्योतिरादित्य यांची फाइल उघडून त्यांची चौकशी करण्याची तयारी कमलनाथ सरकारने सुरू केली आहे. या प्रकरणी तक्रार करणाऱ्या सुरेंद्र श्रीवास्तवने आर्थिक गुन्हे शाखेला पत्र लिहून पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली होती.

ज्योतिरादित्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १० हजार कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा आरोप सुरेंद्र श्रीवास्तव यांनी २०१४मध्ये केला होता. या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली होती. नंतर ही चौकशी रोखण्यात आली. ज्योतिरादित्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरेंद्र श्रीवास्तव यांनी पत्र लिहून आर्थिक गुन्हे विभागाकडे जमीन घोटाळ्याच्या चौकशीची पुन्हा मागणी केली आहे.

सुरेंद्र श्रीवास्तव यांनी गुरुवारी भोपाळमधील अरेरा हिल्स येथील आर्थिक गुन्हे विभागाच्या कार्यालयाला पत्र लिहिले आहे. जमीन घोटाळ्याची सत्यता समोर आणावी अशी मागणी श्रीवास्तव यांनी पत्राद्वारे केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर कमलनाथ सरकार आता ज्योतिरादित्यांविरोधात सूडाचे राजकारण करत असल्याची चर्चा मध्य प्रदेशात सुरू झाली आहे.

जनतेची सेवा हेच सर्वात मोठे उत्तरः शिंदे

काँग्रेसच्या आरोपांचे स्वागतच आहे. या आरोपांना उत्तर देण्याची कुठलीही आवश्यकता आपल्याला वाटत नाही. १८ वर्षात केलेली जनतेची सेवा हेच त्यांना दिलेले सर्वात मोठे उत्तर आहे, असं ज्योतिरादित्य म्हणाले. दरम्यान, ज्योतिरादित्य यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांना पक्षाने मध्य प्रदेशातून राज्यसभेची उमेदवारी जाहीर केलीय. तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here