करोनाने आशियातील सर्वच भांडवली बाजारात कहर केला आहे. आज थायलँड, दक्षिण कोरिया, फिलिपाइन्स या देशांमधील भांडवली बाजारात निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरले. गुरुवारी अमेरिकेतील शेअर निर्देशांक १० टक्क्यांनी कोसळले होते. त्याचे पडसाद भारतीय बाजारांवर उमटले.
आज बाजार उघडताच निफ्टी ९६६ टक्क्यांनी कोसळला आणि त्याला लोअर सर्किट लागले. तो ८६२४ अंकांपर्यंत खाली आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३४०० अंकांनी कोसळला आणि तो २९ हजार २०० अंकांपर्यंत खाली आला. निर्देशांक १० टक्क्यांहून जास्त कोसळल्याने त्यात आणखी घसरण होऊ नये म्हणून शेअर बाजाराने ४५ मिनिटांसाठी ट्रेडिंग बंद ठेवले होते.
आजच्या सत्रात एचसीएल टेक १५ टक्के, टेक महिंद्रा १५ टक्के, कोटक महिंद्रा बँक, टीसीएस, इंडसइंड बँक या शेअर्समध्ये १४ ते १५ टक्के घसरण झाली. बाजार ४५ मिनिटांनंतर पुन्हा सुरु झाला आणि निर्देशांक सावरले. सेन्सेक्सने ३०० अंकांनी झेप घेतली. निफ्टीत ९६ अंकांची वाढ झाली होती.
‘सेन्सेक्स’मोठ्या प्रमाणावर घसरल्याने ‘बीएसई इंडेक्स’वरील कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य गुरुवारी १,२६,००,३६९.४६ कोटी रुपयांपर्यंत घसरले. बुधवारी कंपन्यांचे बाजारमूल्य (मार्केट कॅपिटल) १,३७,१३,५५८.२ कोटी रुपये होते. त्यामुळे एकाच दिवसांत गुंतवणूकदारांना ११ लाख कोटी रुपयांचा फटका बसल्याचे दिसून आले. गेल्या आठवडाभरात मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) कंपन्यांच्या बाजारमूल्यात जवळपास १७ लाख कोटी रुपयांची घट झाली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times