Mumbai Weather Today For The Second Time Temperature Crosses 27 Degrees In Mumbai – Mumbai Weather : मुंबईकरांनो कसं आहे आजचं हवामान? हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे नागरिक हैराण | Maharashtra Times
मुंबई : वारंवार बदलत्या हवामानामुळे (Temperature) मुंबईकर (Mumbaikar) सध्या वैतागले आहेत. ऐन थंडीच्या मौसमात पावसाने हजेरी लावल्यामुळे आधीच लोकांची तारंबळ झाली आहे. अशात आता गरमीचा पाराही वाढल्यामुळे घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. मुंबईत (Mumbai) सध्या गरमी वाढली आहे. दिवस असो वा रात्र, मुंबईकर उन्हाच्या तडाख्याने हैराण झाले आहेत. रविवारी किमान तापमान २७ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. नोव्हेंबर महिन्यात मुंबईचे तापमान २७ अंश सेल्सिअसवर पोहोचण्याची ही दुसरी वेळ आहे. आता नोव्हेंबरच्या (November) अखेरीस किंवा डिसेंबरच्या (December) सुरुवातीलाच मुंबईकरांना दिलासा मिळणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
तसं पाहायला गेलं तर थंडीचा मौसम सुरू झाला आहे. पण मुंबईला उकाडा आणि आर्द्रतेने वेढलं आहे. यातही मुसळधार पाऊसाने सगळ्यांनाच दणका दिला. पावसामुळे तापमानात घट होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पारा घसरण्याऐवजी आणखी वाढला. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात असामान्य वाढ झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. रविवारी मुंबई उपनगरातील किमान तापमान २७ अंश सेल्सिअस आणि शहराचे २५ अंश सेल्सिअसवर पोहोचले. याआधीही ४ नोव्हेंबर २०१८ रोजी किमान तापमान २७.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. दिवसाच्या तापमानातही उष्णता वाढत आहे. रविवारी उपनगरात ३५.४ अंश सेल्सिअस तर शहराचे ३१.८ अंश सेल्सिअस तापमान होते.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाहही थांबला
स्कायमेट या खाजगी हवामान खात्याचे मुख्य मेट्रोलॉजिस्ट महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाहही थांबला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्मा वाढला आहे. पुढील दोन दिवस तापमान असेच राहील आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे थंड वाऱ्यांचा प्रवाह सुरू झाल्याने किमान तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.
येत्या एका आठवडा देशाच्या उत्तरेकडील भागात बर्फवृष्टी होणार नाही, त्यामुळे तिथून येणारे थंड वारे आपल्यासोबत तितकीशी थंडी आणू शकणार नाहीत. अशा स्थितीत मुंबईकरांना नोव्हेंबरअखेरपर्यंत उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. पण यानंतर डिसेंबरमध्येच काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.