माधवी गोगटे यांचा जन्म ७ ऑगस्ट १९६४ रोजी झाला. त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. १९८७ मध्ये ‘सूत्रधार’ चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेमामध्ये पदार्पण केले. तर १९९० मध्ये आलेल्या ‘घनचक्कर’ या चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष लोकप्रिय ठरली होती. ‘घनचक्कर’ या मराठी सिनेमातून त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांनी ‘सत्वपरीक्षा’ या मराठी सिनेमात उत्तम भूमिका साकारली. अनेक नाटकांमध्येही माधवी गोगटे यांनी उत्तम भूमिका साकारल्या होत्या. त्यामध्ये ‘भ्रमाचा भोपळा’,’गेला माधव कुणीकडे’,’अंदाज आपला आपला’ ही त्यांची मराठी नाटके तुफान गाजली.
मराठी नाटके, मराठी-हिंदी सिनेमांबरोबरच माधवी गोगटे यांनी छोट्या पडद्यावरही काम करत स्वतःचा ठसा उमटवला. ‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढुंड लेंगी मंजिल हमें’, ‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिकेत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्याचप्रमाणे ‘स्वप्नांच्या पलीकडले’,’तुझं माझं जमतंय’ या मराठी मालिकेतही त्यांनी काम केले स्टार प्लसवरील ‘अनुपमां’ या मालिकेमुळे त्यांची लोकप्रियता अधिकच वाढली होती. या मालिकेत त्यांनी रुपा गांगुलीच्या आईची भूमिका त्यांनी साकारली होती.
अभिनेत्री माधवी गोगटे यांच्या निधनामुळे मराठीसह हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times