पुण्यातील करोना रुग्णांची संख्या ८वर गेली होती. आज आणखी एक रुग्ण सापडल्याने ही संख्या ९वर गेल्याचं पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं. पुण्यातील हा रुग्ण अमेरिकेहून १ मार्च रोजी पुण्यातील परत आला होता. त्याची तपासणी ११ मार्च रोजी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ९ वर गेली आहे. या रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील करोना विषाणूच्या पाच संशयित रुग्णांना वायसीएम रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. त्यांची तपासणी केली असता, पाचपैकी तीन रुग्णांना करोनाची लागण झाल्यानं निष्पन्न झालं आहे. उर्वरित दोन जणांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. या दोघांना घरी सोडण्यात आलं आहे. तर लागण झालेल्या तीन रुग्णांना उपचारासाठी वायसीएममधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.
दरम्यान, राज्यातील करोना रुग्णांची संख्या १५वर गेली आहे. पुण्यात ९, पिंपरी-चिंचवडमध्ये ३, मुंबईत दोन आणि नागपूरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. या सर्व रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच या रुग्णांच्या संपर्कातील सर्वांचा शोध घेण्यात येत आहे. काही लोकांचा शोध लागला असून त्यांच्या तपासण्या सुरू आहेत, असं सूत्रांनी सांगितलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times