बंटीच्या शब्दांत सांगायचं झालं तर; ‘जगात दोन प्रकारचे चोर असतात. एक; जे स्वार्थीपणे केवळ स्वतःच्या फायद्यासाठीच चोरी करतात, स्वतःचा गल्ला भरतात. गरीबांच्या तोंडचा खासदेखील काढून घेतात. दुसरे; जे ‘रॉबिन हूड’ होऊन गैर मार्गानं धनाढ्य झालेल्यांना लुटतात आणि लुटीचा मुद्देमाल गरजवंतांमध्ये वाटतात. ‘बंटी और बबली २’ ची कथा या दुसऱ्या प्रकारच्या लुटारुंची आहे. हे बंटी आणि बबलीचं अपडेटेड व्हर्जन पेशानं कॉम्प्युटर इंजिनीअर आहे; पण काही कारणास्तव किंवा व्यवस्थेला कंटाळून त्यांनी हा लुटीचा मार्ग अवलंबला आहे. ज्यांनी ज्यांनी २००५ साली प्रदर्शित झालेला अभिषेक बच्चन आणि यांचा ‘द ओरिजनल’ ‘बंटी और बबली’ पाहिला असेल त्यांना ठाऊक असेल की; का? कशासाठी? कशाप्रकारे एक तरुण जोडपं बंटी-बबली झाले आणि त्यांनी लोकांना गंडवत त्यांच्याकडून कसे पैसे उकळले. तीच गोष्ट आता सिनेमाच्या दुसऱ्या भागात अर्थात वरुण शर्माच्या लेखन-दिग्दर्शनात नव्या रंगात पाहायला मिळतेय. निर्माता आदित्य चोप्राचं कौतुक करायला हवं; कारण त्यानं जुन्या सिनेमाचा रिमेक न बनवता कथानकाच्या पुढे रिमेक टच देत सिक्वेल बनवला आहे. त्यामुळे जुन्या प्रेक्षकांसाठी हा सिनेमा नॉस्टॅल्जिक तर; नव्या प्रेक्षकांसाठी रंजक रोलर कोस्टर ठरतो.

यावेळीही बंटी-बबलीची जोडी धनाढ्यांना गंडवून त्यांच्याकडून पैसे उकलणार; हे सिनेमाच्या ट्रेलरवरून स्पष्ट झालं आहे; पण कथानकातील नव्या व्यक्तिरेखांनी; कुणाल () आणि सोनिया (शर्वरी वाघ) यांनी अनोखी रंगत आणली आहे. राकेश () आणि विम्मी (राणी मुखर्जी), जे खरे बंटी आणि बबली आहेत त्यांच्या नावाचा वापर करुन नव्यांनी उलाढाल केलीय. ही उलाढाल काहीशी ‘प्रेडिक्टेबल’ असली तरी ‘फिल गुड’ आहे. पण, या नव्या बंटी-बबलीच्या फसवणुकीच्या उलाढालीमुळे खरे बंटी-बबली अर्थात राकेश-विम्मी अडचणीत येतात. त्यांनी फसवणुकीचा खेळ पंधरा वर्षांपूर्वीच सोडला आहे. राकेश रेल्वेत तिकीट कलेक्टर आहे तर विम्मी एक सामान्य गृहिणी. आता ‘बंटी-बबली’ या नावानं दुसरंच कोणीतरी फसवणूक करताहेत; म्हटल्यावर स्वाभिमान दुखावलेले राकेश-विम्मी नवीन बंटी आणि बबलीला पकडण्यासाठी पोलिस निरीक्षक जटायू सिंग (पंकज त्रिपाठी) यांना मदत करण्यासाठी तयारी दर्शवतात. इकडे सिनेमाचं कथानक वळण घेतं आणि सुरु होते ती; ‘चोर-पोलिस-चोर’ची पकडापकडी.

नव्या बंटी-बबलीच्या या फसवणुकीच्या खेळात लेखकानं सिनेमाला सामाजिक प्रश्नांचा टचही दिलाय. ज्यात राजकीय भ्रष्टाचार, बेरोजगारी, काळा पैसा, पर्यावरण प्रदूषण आदी विषयांवर भाष्य केलं आहे. तसंच क्लायमॅक्स ट्विस्ट अनपेक्षित आहे. सिनेमाची पटकथाही चकचकीत आणि डोळे दिपवणाऱ्या निर्मिती अवकाशातील आहे. पण, सर्व लखलखीत असलं तरी २००५ च्या ‘बंटी और बबली’ची निरागसता दुसऱ्या भागात नाही. त्यामुळे काहींना हा सिनेमा प्रभावी वाटणार नाही. खासकरून अभिषेक आणि राणीच्या जोडीच्या चाहत्यांना अभिषेकची कमतरता भासेल. कलाकारांच्या तोंडी असलेले संवाद सुमार वाटतात. राणी मुखर्जीनं तिची व्यक्तिरेखा शिताफीनं आणि तितक्याच आत्मियतेनं निभावली आहे. सैफ अली खान बंटी म्हणून खटकत असला तरी अभिनेता म्हणून उत्तरार्धात त्यानं दमदार काम केलं आहे. सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ यांच्या वावरात आत्मविश्वास दिसतो. पंकज त्रिपाठीनं त्याच्या खास अंदाजात पोलिस निरीक्षकाची भूमिका वठवली आहे. पहिल्या भागातील गाणी लक्षवेधी ठरली होती. या नव्या सिनेमातील गाणी मात्र तितकीशी प्रभावी ठरत नाही. सिनेमा-सिनेमात तुलना करायची नाही असं ठरवलं तरी ‘बंटी और बबली’च्या आठवणी ज्यांच्या मनात आहे ते आपसूकच ही तुलना करतील. हे कोणत्याही फ्रँचायजी सिनेमाच्या बाबतीत होणं गैर नाही. बाकी सिनेमा धमाल आहे.

सिनेमा : बंटी और बबली २

निर्माता : आदित्य चोप्रा

लेखन-दिग्दर्शन : वरुण शर्मा

कलाकार : राणी मुखर्जी, सैफ अली खान, सिद्धांत चतुर्वेदी, शर्वरी वाघ, पंकज त्रिपाठी

छायांकन : गावेमिक आर्य

संकलन : आरिफ शेख

दर्जा : तीन स्टार

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here