हायलाइट्स:
- जिल्हा बँकेत २१ पैकी २० जागा जिंकत महाविकास आघाडीचं वर्चस्व
- आघाडीत चेअरमनपदासाठी रस्सीखेच सुरू
- तिन्ही पक्षांना प्रत्येकी २० महिने चेअरमन आणि उपाध्यक्षपदाची संधी मिळणार?
राष्ट्रवादीने बँकेत स्पष्ट बहुमत मिळवलं असल्याने जागांच्या आधारावर चेअरमनपद राष्ट्रवादीकडेच ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे काही नेते आग्रही आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा बैठका झाल्या तेव्हा सव्वा-सव्वा वर्ष चेअरमन पद वाटून घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती शिवसेनेच्या नेत्यांनी दिली आहे.
काँग्रेसच्या सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी चेअरमन पद २०-२० महिन्यांसाठी तिन्ही पक्षांना देण्यात येईल, असा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती दिली, तर राष्ट्रवादीचे सर्वाधिक संचालक असून, त्या हिशेबाने हे पद राष्ट्रवादीकडेच राहील, शिवसेना व काँग्रेसला अडीच-अडीच वर्ष व्हाईस चेअरमनपद देण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीकडून देवकर आणि अॅड. पाटील यांची नावे चर्चेत
जिल्हा बँकेत खडसे कुंटुंबात चेअरमनपद राहणार नाही, असं राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत सांगितलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीत इतर इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू असून, राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांचं नाव चेअरमनपदासाठी आघाडीवर आहे. तसंच ज्येष्ठ संचालक ॲड.रविंद्र पाटील यांना देखील अद्याप चेअरमन पद मिळालेलं नसल्यानं त्यांनाही पक्षाकडून संधी देण्यात येण्याची शक्यता आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times