हायलाइट्स:
- ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर
- आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेण्याची शक्यता
- २४ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार
आज सोनियांची घेणार भेट?
दिल्लीत ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी आज सोनिया गांधी यांची भेट घेऊ शकतात. विरोधकांच्या एकजूट प्रयत्नांविषयी या दोन्ही नेत्यांत चर्चा होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षांसहीत ममता बॅनर्जी काँग्रेसच्या इतर वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेऊ शकतात.
उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला
२४ नोव्हेंबर रोजी ममता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. २५ नोव्हेंबर रोजी त्या पुन्हा बंगालला परततील. ‘आपल्या दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बीएसएफ अधिकार क्षेत्राचा मुद्दा उपस्थित करणार’ असल्याचं ममतांनी म्हटलंय.
ममतांचा तीन दिवसीय दौरा चर्चेत
संसद अधिवेशनापूर्वी होणारा ममतांचा तीन दिवसीय दौरा महत्त्वाची मानला जातोय. कृषी कायद्यांच्या माघारीनंतर बीएसएफ अधिकारांसहीत इतर अनेक मुद्यांवर मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची एकजूट करण्याचा ममता प्रयत्न करताना दिसत आहेत.
भाजप – तृणमूल दरम्यान त्रिपुरात घमासान
रविवारी त्रिपुरामध्ये तृणमूल युथ ब्रिगेडचे अध्यक्ष सायोनी घोष यांच्या अटकेविरोधात सोमवारी सायंकाळी तृणमूल खासदारांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. दुपारी गृहमंत्र्यांनी वेळ नाकारल्याच्या विरोधात या खासदारांनी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकसमोर धरणं आंदोलनही केलं होतं.
त्रिपुराच्या आगरतळा स्थित एका पोलीस स्टेशनमध्ये घुसून भाजप कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप तृणमूल कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय. पोलीस स्टेशनच्या आत पोलिसांसमोर आपल्याला भाजप कार्यकर्त्यांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण आणि दगडफेक केल्याचा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केलाय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times