‘आग्नेय आशियावार चीन वर्चस्व गाजवणार नाही, तसेच आपल्या लहान शेजाऱ्यांवरही वर्चस्व गाजवणार नाही,’ असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे. दक्षिण चीन समुद्रावर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
‘असोसिएशन ऑफ साउथईस्ट एशियन नेशन्स‘च्या (आसियान) १० सदस्यांसह ऑनलाइन परिषदेत जिनपिंग यांनी सोमवारी ही टिप्पणी केली. दोन्ही देशांमधील संबंधांच्या ३०व्या वर्धापन दिनानिमित्त या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. चीनने आपल्या वाढत्या सामर्थ्याबद्दल आणि प्रभावाबद्दल चिंता दूर करण्यासाठी वारंवार प्रयत्न केला आहे. विशेषत: संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर चीनने आपला दावा सांगितला असून, आसियान सदस्य असलेल्या मलेशिया, व्हिएतनाम, ब्रुनेई आणि फिलिपाइन्स यांनीही या क्षेत्रावार दावा केला आहे.
जिनपिंग यावेळी म्हणाले, ‘चीनचा हुकूमशाही आणि सत्तेच्या राजकारणाला कठोर विरोध असून, आपल्या शेजाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवू इच्छितो. या प्रदेशात संयुक्तपणे कायमस्वरूपी शांतता राखू इच्छितो.’ तसेच चीनच्या अधिकृत शिन्हुआ या वृत्तसंस्थेनुसार, ‘आपण लहान देशांवर वर्चस्व किंवा दडपशाही करणार नाही,’ असेही जिनपिंग म्हणाले.
चीनच्या तटरक्षक जहाजांनी विवादित दक्षिण चीन समुद्राच्या किनारपट्टीवर सैनिकांना पुरवठा करणाऱ्या दोन फिलिपाइन्स नौकांना रोखल्यानंतर आणि त्यांच्यावर जलतोफांद्वारे मारा केल्यानंतर जिनपिंग यांची ही टिप्पणी आली आहे. फिलिपाइन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांनी परिषदेत आपल्या भाषणात या घटनेचा उल्लेख केला होता.
दरम्यान, दोन राजनैतिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारच्या बैठकीत आसियान सदस्य म्यानमारचे प्रतिनिधित्व केले नाही कारण तेथील लष्कराने लादलेल्या सरकारने आसियानच्या राजदूताला पदच्युत नेत्या आंग सान स्यू की आणि इतर अटक केलेल्या राजकारण्यांना भेटण्यास नकार दिला होता. लष्करी शासक जनरल मिन आंग हुलिंग यांनाही गेल्या आसियान शिखर परिषदेत त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यापासून रोखण्यात आले होते.
फिलिपाइन्सच्या नौका पुन्हा तैनात
दरम्यान, फिलिपाइन्सच्या लष्कराने सोमवारी दक्षिण चीन समुद्रातील विवादित किनाऱ्याचे रक्षण करणाऱ्या आपल्या नौसैनिकांना अन्न पुरवण्यासाठी दोन पुरवठा नौका पुन्हा तैनात केल्या. गेल्या आठवड्यात, चिनी तटरक्षक दलाने फिलिपाइन नौकांना वळवण्यासाठी जलतोफ वापरून केलेल्या हल्ल्याचा मनिलाने तीव्र निषेध केला आणि चीनला इशारा दिला. फिलिपाइन्सचे संरक्षण सचिव डेल्फिन लोरेन्झाना यांनी सांगितले की, नौदल कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या दोन बोटी पश्चिम पलावान प्रांतातून निघाल्या आहेत आणि रात्रभर प्रवास केल्यानंतर त्या दुसऱ्या थॉमस कोस्ट प्रदेशात तैनात असलेल्या नौदलाच्या जवानांपर्यंत पोहोचतील.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times