अण्णा हजारे यांचे सध्या मौन सुरू आहे. देशभरातील महिलांवरील अत्याचारांसंबंधी उपाययोजना आणि निर्भया प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी द्यावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या हजारे यांच्या मौनाचा आज ८१ वा दिवस आहे. यानिमित्त त्यांना भेटण्यासाठी आणि एरवीही गावात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची गर्दी असते. दररोज सुमारे ३०० ते ५०० लोक राळेगणसिद्धीला भेट देतात. त्यातील अनेक जण देशाच्या विविध राज्यांतून आलेले असतात. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र दक्षता घेण्यात येत आहे. त्यामुळे राळेगणसिद्धीमध्येही दक्षता घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला हजारे यांनीही संमती दिली आहे. त्यामुळे गावात येणाऱ्यांना आता हजारे यांना भेटता येणार नाही. हजारे यांच्यासोबत हस्तांदोलन, सेल्फी, फोटोही बंद करण्यात आले आहेत.
याशिवाय राळेगणसिद्धीच्या शाळेतील वसतीगृहात सुमारे ३०० विद्यार्थी राहत आहेत. ते राज्याच्या विविध भागातून आलेले आहेत. त्यांच्या पालकांनाही येथे येऊन आपल्या मुलांना भेटू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील किमान महिनाभर कोणत्याही विद्यार्थ्याला बाहेरगावी जाण्यास परवानगी देण्यात येणार नाही, अशा उपाययोजना करण्यासोबतच गावकऱ्यांचे प्रबोधनही करण्यात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times