हायलाइट्स:
- महिलेच्या हत्या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्याला अटक
- झारखंडमधील जमशेदपूर येथील घटनेने खळबळ
- पैशांसाठी ब्लॅकमेल करायची महिला, आरोपीचा दावा
- हत्या केल्यानंतर मृतदेह फेकला होता तलावात
शहर पोलीस अधीक्षक सुभाषचंद्र जाट यांनी सांगितले की, वर्षा पटेल यांची हत्या प्रकरणाच्या तपासासाठी एक पथक नेमले होते. चौकशी दरम्यान, साकची पोलीस ठाण्यात तैनात एएसआय धर्मेंद्र कुमार याचे तिच्यासोबत शेवटचे बोलणे झाले होते. साधारण १२ नोव्हेंबरला त्यांच्यात बोलणे झाले होते. त्याच आधारे पोलिसांनी धर्मेंद्र कुमार याला अटक केली. चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या दिवशी एएसआय धर्मेंद्र कुमार हा वर्षा पटेल हिच्या घरी बिष्टुपूर येथे गेला होता. तेथून तिला सोबत घेतले आणि आपल्या टेल्को क्वार्टरमधील घरी घेऊन आला. तिथे त्यांचे काही कारणावरून भांडण झाले. त्यानंतर धर्मेंद्र कुमारने तिला मारहाण केली. वर्षाचे डोके भिंतीवर आपटले आणि त्यानंतर तिची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह गोणीत भरला. मृतदेह तार कंपनीच्या जवळील तलावात फेकून दिला. तर तिच्याकडील वस्तू नदीत फेकल्या. तिचा मोबाइल बिष्टुपूर येथील झुडपात फेकून दिला.
पोलीस अधीक्षकांनी माहिती देताना सांगितले की, चौकशीत आरोपी धर्मेंद्र याने पोलिसांना सांगितले की, वर्षा पटेल ही त्याला पैशांसाठी ब्लॅकमेल करायची. त्यामुळे खूपच त्रस्त झालो होतो. तिच्यापासून सुटका करून घेण्यासाठी वर्षा पटेलची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली. पोलिसांनी वर्षा पटेलचा मोबाइल, गोणी, मोटरसायकल आणि त्याचा मोबाइल फोन जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिष्टुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी वर्षा पटेल ही पतीपासून वेगळी राहत होती. ती ब्युटिशियन म्हणून काम करत होती. त्याचवेळी तिची ओळख जीप चालक जिम्मीसोबत झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री आणि त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर जिम्मीचे लग्न झाले. त्यानंतरही वर्षाचे जिम्मीच्या घरी येणे-जाणे असायचे. त्यानंतर जिम्मीने तिची ओळख धर्मेंद्रसोबत करून दिली. त्यानंतर दोघे अनेकदा एकमेकांसोबत दिसून यायचे. अलीकडच्या काही दिवसांत त्यांच्यात भांडणे होत असल्याची माहिती समोर आली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times