अमरावती लाईव्ह न्यूज व्हिडिओ: अमरावतीमध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटला, विद्यार्थ्यांना थेट सोशल मीडियावर मिळाली प्रश्नपत्रिका – students in amravati make tet question paper viral
अमरावती : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरप्रकार झाल्याचा प्रकार शहरातील एका परीक्षा केंद्रावर समोर आला आहे. रविवारी (दि. २१) शहरातील अनेक केंद्रांवर ‘टीईटी’ची परीक्षा घेण्यात आली. याच केंद्रांपैकी नारायणदास लढ्ढा हायस्कूल या परीक्षा केंद्रावर कार्यरत एका परिरक्षाकाने प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर पाठवली तसेच एका परिक्षार्थ्यानेही त्याच्या परिचिताला पाठवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राजापेठ पोलिसांनी संबधित परिरक्षकासह परिक्षार्थीविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन दोघांनाही रविवारी (दि. २१ ) रात्रीच अटक केली आहे.
पवनकुमार शिवप्रसाद तिवारी (४९, राजमातानगर) आणि अकिब नावेद आरिफ बेग (२४, रा. खोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नारायणदास लढ्ढा हायस्कूलमध्ये सुरू असलेल्या परिक्षार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षणाधिकारी यांच्याकडून परिरक्षक म्हणून पवनकुमार तिवारी (४९, राजमातानगर) यांची नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान, याच परीक्षा केंद्रावर परिक्षा केंद्र संचालक असलेल्या महिला अधिकारी यांना परीक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आले होते. लढ्ढा हायस्कूलची जबाबदारी पर्यवेक्षक म्हणून त्यांच्याकडे देण्यात आली होती. डीएसकेंना येरवडा कारागृहात आमदाराने घेतला चावा? व्हायरल बातमीचं धक्कादायक सत्य समोर परीक्षा सुरू झाल्यानंतर केन्द्र संचालक महिला यांना तिवारी यांच्यावर संशय आला. त्यामुळे त्यांनी तिवारी यांचा मोबाईल तपासला. त्यावेळी तिवारीने टीईटीची प्रश्नपत्रिका एका क्रमांकावर सोशल मिडीयाव्दारे पाठवल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला. हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने संपुर्ण केंद्रावरच चौकसपणे तपासणी सुरू केली.
यावेळी याच परीक्षा केंद्रावरील खोली क्रमांक ७ मधील एका परीक्षार्थींवर केंद्र प्रमुखाला संशय आला. त्याचा मोबाईल तपासला असता, त्याने टीईटीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियाद्वारे त्याच्या परिचिताला पाठवून पलीकडून उत्तरे मागितल्याचे लक्षात आले. त्या परीक्षार्थीचे नाव अकीब नवेद आरिफ बेग असे असल्याचे समोर आले. याप्रकरणी रविवारी रात्री केंद्र संचालक महिलेने पवनकुमार तिवारी व अकीब बेग यांच्याविरुद्ध राजापेठ पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी या दोघांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली असल्याचे राजापेठ पोलिसांनी सांगितले आहे.