हायलाइट्स:
- ट्रॅक्टरने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात
- रिक्षाचालक शेजारी उभा असल्याने थोडक्यात बचावला
- अज्ञात ट्रॅक्टरचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूची अवैध वाहतूक करणार्या ट्रॅक्टरचा महसूल विभागाचे कर्मचारी कारवाईसाठी पाठलाग करत असल्याने पकडले जाऊ नये म्हणून वेगाने ट्रॅक्टर चालवण्याच्या नादात चालकाकडून हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातानंतर टॅक्टर चालक उडी मारुन पळून गेला तर विडी ओढण्यासाठी खाली उतरल्याने रिक्षा चालक मजहर खान सखावत खान (वय ३८, रा. पिंप्राळा हुडको) हे थोडक्यात बचावले.
नेमकं काय घडलं?
शहराजवळील बांभोरी येथील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करुन वाहतूक करणारा विना क्रमांकाचा एक ट्रॅक्टर शहरात येत होता. महसूलचे दोन वेगवेगळे पथक अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी नदीपात्राकडे थांबून होते. एक ट्रॅक्टर शहराकडे निघाल्यानंतर एक पथक त्याचा पाठलाग करू लागले. ट्रॅक्टरचालकास ही बाब लक्षात येताच त्याने गती वाढवून महामार्गावरुन धाव घेतली. मात्र, महसूलचे पथक अगदी जवळ पोहोचलेले असल्यामुळे पळून जाणे शक्य नसल्याने चालकाने थेट धावत्या ट्रॅक्टरमधून उजव्या बाजूला उडी घेतली.
रस्त्याच्या डाव्या बाजूला चालकाविना ट्रॅक्टर पुढे येत होता. हा थरार पाहून रस्त्याच्या कडेला असलेले लोक सतर्क होऊन ट्रॅक्टरपासून दूर पळून गेले. हा अनियंत्रित ट्रॅक्टर सुमारे ३० ते ३५ मीटर अंतर पुढे येऊन अखेर मजहर खान यांच्या उभ्या रिक्षाला (एमएच १९ व्ही ३४४१) धडकला. या रिक्षेतून थोड्या वेळापूर्वीच मजहर खान विडी ओढण्यासाठी खाली उतरले होते. यानंतर पुन्हा काही अंतर रिक्षाला फरफट नेल्यानंतर समोरुन महामार्गाच्या कामावर मुरूम वाहून नेणाऱ्या दुसऱ्या एका ट्रॅक्टरवर वाळूचा ट्रॅक्टर धडकला. या दोन्ही ट्रॅक्टरच्या मध्ये अडकल्यामुळे खान यांच्या रिक्षेचा चक्काचूर झाला.
या घटनेनंतर महसूलच्या पथकाने वाळूचा ट्रॅक्टर ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जप्त केला. तसंच अज्ञात ट्रॅक्टरचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times